संशयास्पद हालचाली ः निराश्रित, भटके, भिकारी यांची मदत
ज्ञानेश चव्हाण / सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 29 ः दिल्लीनंतर मुंबईत बॉम्बस्फोट घडविण्याच्या पूर्ण तयारीत असलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या पाच अतिरेक्यांच्या अटकेनंतर त्यांचे काही साथीदार मुंबईत फिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अतिरेक्यांच्या कारवायांना आळा घालण्याकरिता त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी पोलिस रस्त्यावर फिरणारे निराश्रित, भटके, भिकारी व कचरावेचक मुलांची मदत घेणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी "सकाळ'ला दिली. त्या अनुषंगाने पोलिस या मुलांकडे विचारणाही करीत असल्याचे मारिया या वेळी म्हणाले.
दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असणाऱ्या मुंबईत निराश्रित, भटके, भिकारी तसेच कचरावेचकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. शहरातील धार्मिक स्थळे, रेल्वेस्थानके, बाजारपेठा, चौपाट्या, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तूंना दहशतवाद्यांनी नेहमीच लक्ष्य केले आहे. प्रचंड गर्दीच्या या ठिकाणांवर भटके, भिकारी, कचरावेचक मुलांचा मुख्यतः वावर असतो. शहरात होणाऱ्या प्रत्येक संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस अनेकदा सामान्य नागरिक तसेच त्यांच्या खबऱ्यांची मदत घेतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून पोलिसांच्या खबऱ्यांचे जाळे कमकुवत होत असल्याने पोलिसांनी रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या, फिरणाऱ्या मुलांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. प्रमुख रस्ते, चौक तसेच मोहल्ल्यात बऱ्यापैकी अस्तित्व असलेल्या मात्र त्यामानाने दुर्लक्षित समजल्या जाणाऱ्या कचरावेचक, भिकारी व बेवारस मुलांचा उपयोग संशयास्पद हालचालींची माहिती मिळण्यासाठी पोलिस करून घेणार आहेत. रात्री-अपरात्रीच्या सुमारास रस्त्यावर असणाऱ्या या मुलांच्या निदर्शनास येणाऱ्या कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती ते पोलिसांना देणार आहेत. स्थानिक व गुन्हे शाखेचे पोलिस अशा मुलांकडून मिळणाऱ्या माहितीतील तथ्य तपासून त्यावर काम करीत असल्याचे मारिया यांनी सांगितले.
दिल्लीत 13 सप्टेंबर रोजी भीषण बॉम्बस्फोट मालिका घडविल्यानंतर रस्त्यावर कचरा वेचणाऱ्या अशाच एका चौदा वर्षांच्या मुलाने बॉम्ब ठेवणाऱ्या दहशतवाद्यांची माहिती पोलिसांना दिली होती. याच मुलाने दिलेल्या माहितीच्या आधारे अतिरेक्यांनी कचराकुंड्यांत ठेवलेले नऊ बॉम्ब पोलिसांनी निकामी केले. या मुलाच्या जागरुकतेमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी जीवितहानीही टळली. त्यामुळे त्याला दिल्ली पोलिसांकडून बक्षीसही देण्यात आले.
मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या पाच अतिरेक्यांच्या चौकशीत तीस प्रशिक्षित अतिरेक्यांचा गट मुंबईत फिरत असल्याचे उघडकीस आले आहे. अशा परिस्थितीत सामान्य नागरिक, निराश्रित व भटकी मुले यांच्याकडून संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यास पोलिसांना अतिरेक्यांचे मनसुबे उद्ध्वस्त करणे सोपे होणार आहे. गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांची माहिती मिळविण्यासाठी या मुलांचा वापर करून घेण्याबरोबरच राज्य सरकार व काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांच्या पुनर्वसनाचे कामही पोलिस करीत असल्याचे राकेश मारिया यांनी या वेळी सांगितले.
-------------------
पोलिसांनी गेल्या दोन वर्षांत ताब्यात घेऊन पुनर्वसन केलेल्या मुलांची आकडेवारी
वर्ष - मुले - मुली
2006 - 427 - 157
2007 - 598 - 233
2008 - 297 - 103
--------------------------------
1 comment:
सर्व लहान मोठ्या शहरांतून असेच नेटवर्क तयार केले पाहिजे.
Post a Comment