Tuesday, October 7, 2008

जुहूतील रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा

अमली पदार्थ जप्त ः झिंगून बेधुंद नृत्य करणारे 231 तरुण-तरुणी ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 6 ः जुहूच्या "बॉम्बे 72 डिग्री' पबमध्ये सुरू असलेल्या "रेव्ह पार्टी'वर अमली पदार्थविरोधी पथकाच्या पोलिसांनी आज पहाटे छापा टाकून अठरा ते पंचवीस वयोगटातील 231 तरुण-तरुणींना ताब्यात घेतले. यात राजकीय, सिनेसृष्टी व व्यावसायिक क्षेत्रातील बड्या धेंडांच्या मुलांचा समावेश आहे. अभिनेता शक्ती कपूर याचा मुलगा सिद्धांत याचाही त्यात समावेश आहे. त्याचबरोबर अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या आठ जणांना या वेळी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 850 एलएसडी गोळ्या, 104 एक्‍सटसी ड्रॉप्स या महागड्या अमली पदार्थांसह 250 ग्रॅम चरस, अफू व गांजा या अमली पदार्थांचा साठा आणि एक लाख 56 हजार रुपयांची रोकड हस्तगत केल्याची माहिती या पथकाचे उपायुक्त विश्‍वास नांगरेपाटील यांनी दिली; मात्र या पार्टीत सहभागी झालेल्या तरुण-तरुणींविषयी तपशीलवार माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

पबमध्ये उच्चभ्रू समाजातील तरुण-तरुणींना अमली पदार्थांचे वितरण करण्यासाठी आठ जण येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाच्या पोलिसांना एका स्वयंसेवी संस्थेकडून मिळाली. सतत तीन दिवस सापळा रचल्यानंतर मध्यरात्री पोलिसांनी या पबवर छापा घातला. या कारवाईच्या वेळी पबमध्ये अठरा ते पंचवीस वयोगटातील "हायप्रोफाईल' तरुण-तरुणी मादक पदार्थांच्या अमलाखाली तसेच डीजेच्या तालावर बेधुंद नाचताना आढळली. पोलिसांनी या मुलांसह पबमध्ये पार्टीसाठी आलेल्या एकूण 231 जणांना ताब्यात घेतले. त्यात 38

तरुणींचा समावेश आहे. याशिवाय अमली पदार्थांच्या विक्रीसाठी आलेले आठ जण तसेच ही पार्टी आयोजित करणाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या या मुलांमध्ये चित्रपटसृष्टी व राजकीय क्षेत्रासह शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मुलांचा समावेश आहे. अभिनेता शक्ती कपूर याचा मुलगा सिद्धांत यालादेखील या वेळी पोलिसांनी ताब्यात घेतले; मात्र तो कसल्याही प्रकारचे व्यसन करीत नसल्याचे शक्ती कपूर यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना सांगितले.

ताब्यात घेतलेल्या या तरुण-तरुणींची कूपर, सेंट जॉर्ज व जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यानंतर त्यांना आझाद मैदान येथील पोलिस क्‍लबमध्ये ओळख पटविण्यासाठी नेण्यात आले. ओळख पटवून झाल्यानंतर बड्या धेंडांची ही मुले आपले तोंड लपवत बाहेर पडताना दिसत होती. या मुलांचे पालकही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. ताब्यात घेतलेल्या या तरुण-तरुणींवर कोणतीही कारवाई झालेली नाही. या मुलांची ओळख पटवून त्यांना सोडून देण्यात येत आहे. त्यांच्या रक्त व लघवीचे नमुने पोलिसांनी घेतले असून ते तपासणीकरिता फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहेत. फॉरेन्सिक सायन्स लॅबचा अहवाल येत्या दीड महिन्यात आल्यानंतर त्यात दोषी आढळणाऱ्यांवर अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती या पथकाचे उपायुक्त नांगरे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या कारवाईत अटक केलेल्या आठ जणांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
--------------------------
ते निर्दोष आहेत...
माझा मुलगा त्याच्या मित्रांसह वाढदिवसाच्या पार्टीसाठी या पबमध्ये गेला. बारा जणांच्या त्याच्या ग्रुपमध्ये सिनेअभिनेता व राजकीय नेत्याच्या मुलाचाही समावेश होता. पबच्या टेरेसवर जेवत असताना पोलिसांनी छापा घातला आणि सर्वांना ताब्यात घेतले. या पबमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याचे त्यांनाही नंतर कळाले. या संपूर्ण प्रकारात आपला मुलगा दोषी आढळल्यास त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा द्या. मात्र कशात काही नसताना प्रसिद्धिमाध्यमे व पोलिस या मुलांना आरोपींप्रमाणे वागवत असल्याची खंत एका पालकाने "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. मुलांवर झालेल्या अशा प्रकारच्या कारवाईमुळे मुलांसोबत आमचीही इभ्रत वेशीवर टांगली आहे. सुक्‍यासोबत ओले जळण्याचाच हा प्रकार असल्याचे या पालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
-----------------------------------

No comments: