मराठीचा कधीच
अवमान केला नाही
के. एल. प्रसाद ः महाराष्ट्र माझी कर्मभूमी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 11 ः "मुंबई कोणाच्या बापाची नाही' या बेलगाम वक्तव्याने उपमुख्यमंत्र्यांच्या रोषाला सामोरे जावे लागल्यानंतर कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त के. एल. प्रसाद यांचे मराठीप्रेम जागे झाले आहे. महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी असून मराठी भाषेचा आपण कधीच अवमान केला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी आज दिली.
खासदार जया बच्चन यांनी केलेल्या विधानानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आंदोलन छेडले. या आंदोलनानंतर शहरात मनसेच्या दोन हजारहून अधिक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर चेंबूर येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत सहपोलिस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी "मुंबई कोणाच्या बापाची खासगी मालमत्ता नाही, हे शहर सबंध देशवासीयांचे आहे,' असे वक्तव्य केले होते. मराठी माणसांचे मन दुखावणाऱ्या प्रसाद यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली. खुद्द उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी प्रसाद यांच्याकडे याबाबत खुलासा मागितला.
चेंबूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण मराठी माणूस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अथवा अध्यक्ष राज ठाकरे यांचे कुठेही नाव घेतले नाही. शहरात गुंडागर्दी करणारे, दंगल भडकवणारे तसेच सर्वसामान्य नागरिकाच्या मनात दहशत निर्माण होईल, असे कृत्य करणाऱ्यांबाबत आपण हे वक्तव्य केले. असे प्रकार करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा आपल्या वक्तव्याचा रोख होता. मराठी भाषेबद्दल मला आदर आहे. दक्षिण भारतीय असताना आपण मराठी भाषा आत्मसात केल्याचेही प्रसाद या वेळी म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रसाद यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. यावर ते म्हणाले, राज ठाकरे हे राजकारणी आहेत. त्यामुळे ते काहीही बोलू शकतात. सरकारी अधिकारी असल्याने त्यांच्याप्रमाणे भाष्य करणे अयोग्य असल्याचेही प्रसाद या वेळी म्हणाले. प्रसिद्धिमाध्यमातून प्रसारित झालेले मुंबई कोणाच्या बापाची मालमत्ता नाही, हे विधान आपण केलेल्या संपूर्ण विधानाचा अर्धा भाग आहे. त्यापूर्वीचे विधान न दाखविता वृत्त वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी अर्धवटच विधान दाखविल्याचेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment