त्या "ई-मेल'प्रकरणी केनेथ निर्दोष
परमबीर सिंग ः अधिकाऱ्यांनी पैसे मागितल्याचा आरोप खोटा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 11 ः अहमदाबाद बॉम्बस्फोट मालिकेचा ई- मेल पाठविल्याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) संशयाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर पळून गेलेला अमेरिकन नागरिक केनेथ हेवूड याने आज दहशतवाद विरोधी पथकाच्या कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणातून मुक्ततेकरिता एटीएसच्या अधिकाऱ्यांवर पैसे मागितल्याचा झालेला आरोप खोटा असून हा प्रसिद्धिमाध्यमांचा बनाव असल्याचे हेवूडने दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे. ई-मेल प्रकरणात हेवूडवर पोलिसांचा कसलाही संशय नाही, तो निर्दोष असल्याचा निर्वाळा या पथकाचे अतिरिक्त आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
अहमदाबाद येथे 26 जुलैला झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेचा ई-मेल सानपाडा येथे राहणाऱ्या केनेथ हेवूड याच्या कॉम्प्युटरवरून पाठविण्यात आला. या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी सुरू असतानाच तो दिल्ली विमानतळावरून अमेरिकेला पळून गेला.
बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भारतात परतलेला हेवूड आज एटीएसच्या कार्यालयात दाखल झाला. त्याच्या सुटकेसाठी एटीएसच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून लाच मागितल्याचा आरोप त्याने केला होता. मात्र आज त्याने पोलिसांना दिलेल्या निवेदनात पोलिसांवर झालेला हा आरोप खोटा असल्याचे म्हटल्याचे अतिरिक्त आयुक्त सिंग यांनी सांगितले.
चौकशी सुरू असेपर्यंत हेवूडने देश सोडू नये यासाठी पोलिसांनी लुकआऊट नोटीसही जारी केली. मात्र दिल्लीच्या विमानतळ सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून तो इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून फरारी झाला. त्याच्या पलायनाबाबत दुसऱ्या एजन्सी तपास करीत आहेत. हेवूड निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्याने त्याला त्याचे कॉम्प्युटर व लॅपटॉप घेऊन जाता येतील, असेही ते म्हणाले.
प्रसिद्धिमाध्यमांच्या हातावर तुरी देत हेवूड पुन्हा निसटला...
नागपाडा येथील एटीएसच्या मुख्यालयात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आलेला केनेथ हेवूड सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलिसांपुढे आपला जबाब नोंदवीत होता. हेवूडची मुलाखत घेण्याकरिता प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींचीही झुंबड उडाली. मात्र त्यांच्या हातावर तुरी देऊन केनेथ मागच्या दरवाजाने पुन्हा पसार झाला. त्याच्या मागावर असलेल्या वृत्तवाहिन्यांच्या काही पत्रकारांनी नागपाडा सिग्नलवर त्याची गाडी अक्षरशः अडवून त्याचा "बाईट' घेतला.
No comments:
Post a Comment