Wednesday, September 10, 2008

पीव्हीआर चित्रपटगृहावर "मनसे'ची दगडफेक

चौघांविरुद्ध गुन्हा ः "द लास्ट लियर'चा प्रीमियर रद्द

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 10 ः अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांच्या महाराष्ट्रद्वेषी वक्तव्याबाबत बच्चन कुटुंबीय जोपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांचा कोणताच चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, असा पवित्रा घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज जुहूच्या पीव्हीआर चित्रपटगृहावर दगडफेक केली. चित्रपटगृहाच्या काचा, तसेच जाहिरातीसाठी वापरण्यात येणाऱ्या मोठ्या एलसीडी स्क्रीनचे या दगडफेकीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पोलिसांनी या प्रकरणी चार अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याच चित्रपटगृहात होणारा अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेल्या "द लास्ट लियर' या चित्रपटाचा प्रीमियर रद्द करण्यात आला.
"हम यूपीवाले है, हिंदीमेंही बात करेंगे; महाराष्ट्र के लोग हमे माफ करे' या खासदार जया बच्चन यांच्या मराठीद्वेषी विधानानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आंदोलनाला सुरुवात केली. बच्चन कुटुंबीयांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागितल्याशिवाय त्यांचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, असा सज्जड इशारा दिल्यानंतरही जुहूच्या पीव्हीआर चित्रपटगृहात अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेला "द लास्ट लियर' या चित्रपटाचा प्रीमियर होणार होता. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चार तरुण या चित्रपटगृहाजवळ आले. त्यातील दोघे चित्रपटाचे तिकीट काढण्याच्या बहाण्याने तिकीट काऊंटरजवळ जाऊन उभे राहिले. दोघांनी सोबत आणलेले दगड चित्रपटगृहाच्या दर्शनी भागात असलेल्या काचांवर, तसेच जाहिराती दर्शविणाऱ्या मोठ्या एलसीडी स्क्रीनवर भिरकावले. यानंतर तिकीट काऊंटरजवळ उभ्या असलेल्या अन्य दोघांनी सोबत आणलेल्या दांड्यांनी भिंतीवरील जाहिरातीच्या कार्टुनची तोडफोड करायला सुरुवात केली. अचानक सुरू झालेल्या या तोडफोडीनंतर चित्रपटगृहात एकच खळबळ उडाली; मात्र हा प्रकार चित्रपटगृह व्यवस्थापनाच्या लक्षात येण्यापूर्वीच या चारही तरुणांनी तेथून पोबारा केला. या घटनेनंतर तेथे पोलिस दाखल झाले. दगडफेक करून चित्रपटगृहाचे नुकसान करणाऱ्या या चारही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती जुहूचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक काथकाडे यांनी दिली. या दगडफेकीनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या चित्रपटगृहाची पाहणी केली. दगडफेकीच्या घटनेनंतर या चित्रपटगृहात होणारा "द लास्ट लियर' चित्रपटाचा प्रीमियर रद्द झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.
.......

No comments: