Wednesday, September 10, 2008

"होमगार्डस्‌'ना भत्तावाढीचा दिलासा

हेमंत गायकवाड : दलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई ः नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी पोलिसांसह अन्य संस्थांच्या खांद्याला खांदा लावून मदतकार्यात भाग घेणारे होमगार्डस्‌ तसे दुर्लक्षितच राहतात. पोलिसांएवढेच काम करूनही त्यांना दिवसाला नाममात्र 90 रुपये भत्त्यापोटी मिळत होते. आता मात्र त्यांच्या दैनिक भत्त्यात वाढ करण्यात आली असून, यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या महिन्यापासून ही वाढ लागू होत आहे. मुंबईसह आयुक्तालयांच्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या होमगार्डस्‌ना यापुढे दिवसाला 200 आणि ग्रामीण भागातील होमगार्डस्‌ना 175 रुपये भत्ता दिला जाणार आहे. भत्त्यात वाढ झाल्यामुळे पुन्हा या दलाकडे होमगार्डस्‌ आकर्षित होऊ लागतील, असा विश्‍वास बृहन्मुंबईचे समादेशक डॉ. हेमंत गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
आपत्तीच्या वेळी पोलिस व अन्य संस्थांना मदतकार्य करणारी मानवसेवी संघटना म्हणून होमगार्डस्‌ची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला ही संघटना वर्षातील 53 दिवस काम करीत असे. मात्र 2004 नंतर होमगार्डस्‌ वर्षभर पोलिसांच्या साथीने काम करू लागले. या संघटनेचे राज्यभरात 58 हजार आणि मुंबईत 3500 जवान आहेत. मुंबईवर नेहमीच दहशतवादाचे सावट असल्याने शहरातील प्रमुख ठिकाणांवरील सुरक्षा बंदोबस्तात होमगार्डस्‌ मोलाची भूमिका बजावताना दिसतात. दिवसाला दहा तासांपेक्षा अधिक वेळ काम करणाऱ्या या जवानांना अवघा 90 रुपये दैनिक भत्ता दिला जात होता. महागाई वाढत असूनही अनेक वर्षे जवानांच्या भत्त्यात वाढ झाली नव्हती. त्यामुळे कित्येक जवान दलाच्या कार्यक्रमांना फिरकत नसल्याचे चित्र होते. यंदाच्या गणेशोत्सव काळातही सुरक्षाव्यवस्था राखण्यासाठी आणि जनसमुदायावर नियंत्रण ठेवण्यासाठी होमगार्डस्‌चे कसेबसे 1650 जवान उपलब्ध झाले आहेत.
पोलिसांएवढेच काम करणाऱ्या या जवानांच्या भत्त्यात वाढ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने यासंबंधीचा अध्यादेश 1 सप्टेंबरला काढला. दैनिक भत्त्यात झालेल्या वाढीनंतर या दलाकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलेल, असा विश्‍वास डॉ. हेमंत गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. या दलात केवळ राष्ट्रसेवेकरिता दाखल होणाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे. येत्या काळात या दलातील जवानांची संख्या 5,500 पर्यंत नेण्याचा मानसही गायकवाड यांनी व्यक्त केला.
-----------------------------
तीन महिन्यांनी मिळतो भत्ता...
होमगार्डस्‌च्या भत्त्यात वाढ झाली असली, तरी या जवानांना कामाचा मोबदला तीन महिन्यांनी मिळतो. राष्ट्रसेवा म्हणून या दलात जवान दाखल होत असले, तरी त्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता हा भत्ता लवकर देण्यात यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील होमगार्डस्‌च्या भत्त्यासाठी यावर्षी दोन कोटी 83 लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. भत्त्यात झालेल्या वाढीनंतर हे अनुदान वाढविण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
-------------------------

No comments: