नोकराचे कृत्य ः साडेसोळा लाखांचा ऐवजासह पोबारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 15 ः सहा दिवसांपूर्वी घरकामासाठी ठेवलेल्या नोकराने मालकीण घराबाहेर गेल्यानंतर तिच्या वृद्ध सासूची उशीने तोंड दाबून; तर बारा वर्षांच्या मुलाची पाण्याच्या टबमध्ये बुडवून निर्घृण हत्या केल्याची घटना सांताक्रूझ येथे घडली. यानंतर नोकराने कपाटात ठेवलेले बारा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व साडेचार लाखांची रोख असा साडेसोळा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. आज भरदुपारी घडलेल्या या घटनेने सांताक्रूझ परिसरात खळबळ उडाली.
सांताक्रूझ पश्चिमेला टिळक रोडवर असलेल्या शोभना इमारतीत हा प्रकार घडला. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या उदय पारेख यांनी त्यांच्या घरात घरकाम करण्यासाठी अवघ्या सहा दिवसांपूर्वी एक नेपाळी नोकर ठेवला होता. मुलगा हर्षवर्धन (12) याची प्रकृती बरी नसल्याने उदया यांच्या पत्नी राजूल मुलाच्या शाळेत गृहपाठाची विचारणा करायला गेल्या होत्या. यावेळी घरात त्यांची सासू उषाबेन ईश्वरलाल पारेख (74) व मुलगा असे दोघेच जण होते. घरात दोघेच असल्याचे पाहून या नोकराने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उषाबेन यांच्या तोंडात कापडी बोळा कोंबून उशीने त्यांचे तोंड दाबल्याने त्या जागीच मरण पावल्या. यानंतर हर्षवर्धनचे हातपाय बांधून त्याला बाथरूममधील पाण्याच्या टबमध्ये बुडवून मारले. या निर्घृण हत्येनंतर या नोकराने कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख असा साडेसोळा लाख रुपयांचा ऐवज चोरून पळ काढला. दोन वाजण्याच्या सुमारास घरी परतलेल्या राजूल यांना घराचा दरवाजा उघडाच दिसला. घरात शिरताच आत सासू उषाबेन यांचा मृतदेह आढळला. पाण्याच्या टबमध्ये टाकलेल्या हर्षवर्धन याला त्यांनी उपचारासाठी तातडीने नानावटी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच तो मरण पावला. या प्रकरणी त्यांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात नोकराविरुद्ध तक्रार दिली असून अधिक तपास सुरू आहे.
No comments:
Post a Comment