गणरायांना जल्लोषात निरोप
जनसागर उसळला : दहशतवादाचे सावट झुगारले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 14 ः दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या अतिदक्षतेच्या इशाऱ्यानंतरही लाखोंच्या जनसागराने आज आपल्या लाडक्या गणरायाला ढोल-ताशांचा गजर, गुलालाची मुक्त उधळण, फटाक्यांची आतषबाजी; तसेच डीजेच्या तालावर नाचत अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात निरोप दिला. अकरा दिवसांच्या सळसळत्या उत्साहानंतर आज विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देताना दहशतवादाचे कोणतेही सावट या गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर तसूमात्रही दिसत नव्हते.
दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकांचा ई-मेल चेंबूर येथून पाठविल्याचे उघडकीस आल्यानंतर मुंबईसह राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला होता. दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याने मुंबईत गणेशोत्सवानिमित्त आधीच कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यातच दिल्ली बॉम्बस्फोट मालिकेनंतर ही सुरक्षा व्यवस्था आणखी वाढविण्यात आली होती. आज सकाळपासूनच लाखो भाविकांनी गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला.
राजाला पाहण्यासाठी गर्दी
भाविकांची प्रचंड गर्दी खेचणाऱ्या लालबागच्या राजाला पाहण्यासाठी सबंध मुंबईकरांनी प्रचंड गर्दी केली होती. रस्त्याच्या कडेला, इमारतींच्या गच्चीवर; तसेच जागा मिळेल तेथे उभे राहून हे भाविक आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची मिरवणूक याची देही याची डोळा पाहत होते. "गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या ' परंपरागत घोषणांपासून "ही प्रजा कोणाची... लालबागच्या राजाची' यासारख्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. याच मार्गांनी लालबाग गणेशगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रंगारी बदक चाळ , चिंचपोकळीचा चिंतामणी, बालयुवक उत्सव मंडळ अशा मोठ्या मंडळांच्या मानाच्या गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुका निघणार असल्याने भाविक तासन् तास या मार्गावर उभे होते. लालबाग उड्डाणपुलाजवळच असलेल्या श्रॉफ इमारतीतून या मार्गाने येणाऱ्या गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करण्याचा सोहळाही भाविक मनोभावे पाहत होते. नाशिक ढोल आणि डीजेच्या कानठळ्या बसविणाऱ्या म्युझिकवर थिरकणाऱ्या तरुणाईचा अलोट उत्साह डोळ्यांचे पारणे फेडत होता. अंगात पांढरा सदरा, डोक्यावर "लालबागचा राजा' लिहिलेली टोपी, गळ्यात ओळखपत्र घातलेले हजारो स्वयंसेवक उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. या गर्दीचा गैरफायदा घेऊन समाजकंटकांनी कोणताही अनुचित प्रकार करू नये, याकरिता साध्या वेशातील पोलिस गर्दीत फिरत होते. राज्य राखीव पोलिस दल, रॅपिड ऍक्शन फोर्सच्या तुकड्यांसह पोलिस डोळ्यात तेल घालून प्रत्येक संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवून होते. गणेशभक्तांच्या सुविधेसाठी या परिसरात सामाजिक संस्था व राजकीय पक्षांनी पाणपोई; तसेच अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती.
No comments:
Post a Comment