Wednesday, September 10, 2008

बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी हे दहशतवादी कृत्य ठरणार

प्रस्ताव सादर ः फसव्या फोनमुळे सोळा हजार मनुष्यतास वाया

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 9 ः "रेल्वेत बॉम्ब ठेवलाय वाचवू शकलात तर वाचवा' अथवा "अमुक एक स्थानक बॉम्बस्फोटांनी उडविले जाणार आहे'. मोबाईल किंवा पीसीओवरून अशा प्रकारच्या धमक्‍या देऊन सुरक्षा यंत्रणांची उडणारी त्रेधातिरपिट मूकपणे पाहणाऱ्या रिकामटेकड्यांमुळे गेल्या पन्नास दिवसांत पोलिस यंत्रणा आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या कामाचे तब्बल सोळा हजार तास वाया गेले आहेत. "टाइमपास' म्हणून केल्या जाणाऱ्या अशा फसव्या दूरध्वनींना आळा घालण्याकरिता यापुढे असे प्रकार दहशती कृत्याचा भाग म्हणून हाताळले जावेत, असा प्रस्ताव रेल्वे सुरक्षा बल केंद्रीय गृहखात्याला पाठविणार आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरीक्षक बी. एस. सिद्धू यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

दहशतवादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर संवेदनशील ठिकाणांवर घातपात घडविण्यासंबंधी आलेल्या निनावी दूरध्वनीबाबत रेल्वे सुरक्षा बलाने 9 जुलै ते 28 ऑगस्टदरम्यान विशेष पाहणी केली. या पाहणीनुसार रेल्वे पोलिस तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या नियंत्रण कक्षांना रेल्वेत बॉम्ब ठेवल्याचे तेरा निनावी दूरध्वनी आले. या दूरध्वनींमुळे त्या त्या स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेत तातडीने वाढ करण्यात आली. हे दूरध्वनी अफवांचे असल्याचे सिद्ध झाल्यानंतर ते करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. यातील बहुतांश दूरध्वनी मोबाईल फोनवरून करण्यात आले. मोबाईल कंपन्यांकडे मोबाईलधारकांच्या वास्तव्याचे खरे पत्ते उपलब्ध नसल्याने उरलेले आरोपी पोलिसांना पकडता आले नाहीत. फसवे दूरध्वनी करून पोलिस यंत्रणा व सामान्य नागरिकांत घबराट पसरविणारे हे आरोपी त्यांना अटक झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी जामिनावर सुटतात. निव्वळ वेळ वाया घालविण्यासाठी केले जाणारे अफवांचे दूरध्वनी यापुढे दहशतवादी कृत्याचा भाग म्हणून हाताळले जावेत व दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी केंद्रीय गृहखात्याकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे सिद्धू यांनी या वेळी सांगितले. या अफवांमुळे मुंबई, भुसावळ व नागपूर येथील 12 गाड्या रद्द करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
अफवांच्या या दूरध्वनींमुळे दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना सुरक्षा यंत्रणांच्या कार्यतत्परतेचा अभ्यास करता येतो. रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा दलांच्या सुरक्षिततेतील उणिवांच्या जोरावर घातपाताच्या योजना आखण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे संशयित हालचालींची तसेच रेल्वे स्थानकात ठेवलेल्या बेवारस वस्तूंची माहिती नागरिकांनी पोलिसांना तातडीने कळवावी; मात्र उगीचच दूरध्वनी करून संपूर्ण यंत्रणेची त्रेधा उडविण्यासाठी फसवे दूरध्वनी करणे बंद करावेत, असे आवाहनही सिद्धू यांनी या वेळी केले.

No comments: