Thursday, July 30, 2009

अतिरेक्‍यांचे मृतदेह ताब्यात घ्या!

मुंबई हल्ल्याच्या वेळी पोलिस आणि एनएसजी कमांडोंनी कंठस्नान घातलेल्या लष्कर ए तोयबाच्या अतिरेक्‍यांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानला पुन्हा एकदा पत्र पाठविले जाणार असल्याची माहिती मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शेकडो निष्पापांचे प्राण घेणाऱ्या लष्कर ए तोयबाच्या दहापैकी नऊ अतिरेक्‍यांचे मृतदेह गेल्या आठ महिन्यांहून अधिक काळ जे जे रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. पोलिसांच्या हाती जिवंत सापडलेला त्यांचा साथीदार अतिरेकी मोहम्मद अजमल कसाबच्या चौकशीत हे सर्व अतिरेकी पाकिस्तानचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी या अतिरेक्‍यांचे मृतदेह ताब्यात घेण्याबाबत पाकिस्तानकडे विचारणा केली होती; मात्र पाकिस्तानने हात झटकून हे अतिरेकी पाकिस्तानी नसल्याचे म्हटले होते. मुंबई हल्ल्याचा खटला सुरू झाल्यानंतर या प्रकरणात पुन्हा आपली भूमिका बदलत अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब हा पाकिस्तानचा रहिवासी असल्याचे कबूल केले होते. यानंतर पाकिस्तानने या हल्ल्यात पोलिस आणि एनएसजी कमांडोंच्या गोळीबारात ठार झालेले अबु आकाशा ऊर्फ बाबर इम्रान आणि अब्दुल रहमान बडा ऊर्फ शफीक अर्शद हे अतिरेकीदेखील पाकिस्तानच्या मुलतान प्रांतात राहणारे असल्याची कबुली दिली आहे. अबू आकाशा याला नरिमन हाऊसमध्ये; तर अब्दुल रहमान बडा याला हॉटेल ताजमध्ये एनएसजी कमांडोंनी गोळीबारात ठार मारले होते.
या अतिरेक्‍यांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी पुन्हा नव्याने पत्रव्यवहार करण्याचे ठरविल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. जे.जे. रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आलेल्या या अतिरेक्‍यांच्या कुटुंबीयांची माहिती मिळविण्यासाठी यापूर्वी पोलिसांनी ब्लॅक कॉर्नर नोटीसही बजावली होती; मात्र पोलिसांच्या या पत्रव्यवहाराला यश आले नव्हते. या अतिरेक्‍यांना भारतात दफन करण्यास काही मुस्लिम संघटनांनीही विरोध दर्शविला होता. पाकिस्तान सरकारने कसाब आणि ठार झालेले अन्य दोन अतिरेकी पाकिस्तानी असल्याचे सांगितले असले, तरी अद्याप त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडे कोणीही दावा केलेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.


(sakaal, 22nd july)

No comments: