Thursday, July 16, 2009

नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडणार!




पावसाळ्यानंतर केंद्र सरकार करणार धडक कारवाई


नक्षलग्रस्त भागात सातत्याने वाढत असलेल्या हल्ल्यांच्या मुकाबल्यासाठी केंद्र सरकारने खास प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्यानंतर या नक्षलवाद्यांवर धडक कारवाई करण्याची पोलिसांची योजना आहे. ऑक्‍टोबरअखेर जोमाने सुरू होणाऱ्या या कारवाईसाठी केंद्राकडून महाराष्ट्रात केंद्रीय अर्धसैनिक सुरक्षा दलाचे तीन हजार जवान पाठविले जाणार आहेत. गडचिरोली आणि गोंदिया या भागांत हे जवान तैनात केले जाणार आहेत. ही माहिती राज्य पोलिस दलातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यात गडचिरोली आणि गोंदिया येथील नक्षलवाद्यांच्या कारवायांत गेल्या दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगड हद्दीवर असलेल्या राजनांदगावच्या मानपूर या गावात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी दोन दिवसांपूर्वी 38 पोलिसांचे बळी घेतले. त्यापूर्वी गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सोळा पोलिस धारातीर्थी पडले. या घटनेनंतर राज्य पोलिस दलाने गडचिरोली आणि गोंदिया या भागांत गस्त वाढविली आहे. गेल्या काही महिन्यांत नक्षलग्रस्त भागांत वाढलेल्या कारवायांची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या दोन्ही राज्यांच्या सीमेवर असलेल्या अंबुजमाड भागात प्रामुख्याने नक्षलवाद्यांच्या कारवायांचे केंद्र आहे. तब्बल चार हजार चौरस किलोमीटरचा हा परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असल्याने या ठिकाणी पोलिसांना थेट कारवाई करणे अवघड होते. नक्षलवाद्यांशी मुकाबला करण्याकरिता नक्षलग्रस्त राज्यांत केंद्र सरकारने "स्पेशल कमांडो' पथक तयार केले असून केंद्रीय राखीव पोलिस दलाकडे नक्षलवाद्यांविरुद्धच्या लढाईचे नेतृत्व सोपविले आहे.
नक्षलवाद्यांच्या कारवायांचा कडवा मुकाबला करण्यासाठी ऑक्‍टोबरमध्ये पोलिसांची विशेष "ऑपरेशन' सुरू होणार आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक पी. पी. श्रीवास्तव यांनी "सकाळ'ला दिली. सध्या या भागात पोलिसांची विशेष पथके नेमलेली असून त्यांची नक्षलवाद्यांच्या वेगवेगळ्या "दलम्‌'सोबत लढाई सुरूच आहे; मात्र केंद्र सरकारकडून ऑक्‍टोबरमध्ये मिळणाऱ्या तीन बटालियनच्या (तीन हजार जवान) मदतीने नक्षलवादी कारवायांना कायमस्वरूपी आळा घालण्यास मदत होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. रविवारी महाराष्ट्राच्या सीमेवर छत्तीसगडमधून पोलिसांवर हल्ला करणाऱ्या नक्षलवाद्यांची पद्धत गेल्या महिन्यात गडचिरोलीत पोलिसांवर झालेल्या हल्ल्याशी मिळतीजुळती असल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

(sakaal, 14 th july)

No comments: