Thursday, July 30, 2009

लाटांच्या तांडवात काही भिजले, तर काही थिजले...


मुंबईत किनाऱ्यांवर निर्बंध झुगारून गर्दीला उधाण!


गेल्या आठवडाभरापासून गाजत असलेले "मोसमा'तील सर्वात उंच लाटेचे भाकित "याचि डोळा' अनुभवण्यासाठी मुंबईकरांनी शुक्रवारी सगळेच किनारे, चौपाट्यांवर प्रचंड गर्दीचे उधाण आणले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सागराचे हे कौतुक पाहणारे हौशी मुंबईकर अवाढव्य-बेभान लाटांचे तुषार अंगावर घेत जल्लोषात बुडाले. काहीजण लाटांनी असे मजेत भिजले, तर किनारपट्टीवरील जी घरे या लाटांच्या तडाख्यांनी कोसळली तेथील रहिवासी दर्याचे हे रौद्र रूप पाहून थिजून गेले. मुंबईतील जनजीवनाच्या अशा दोन बाजू आज अनुभवास आल्या.

आज (शुक्रवारी) दुपारी दोन वाजून तीन मिनिटांनी तब्बल 5.5 मीटर उंचीची लाट उसळणार असल्याचे भाकित हवामान खात्याने वर्तविले होते. त्या वेळी समुद्रात महाकाय लाटा उसळल्याने समुद्रकिनारी जमलेल्या नागरिकांनी एकच जल्लोष केला. या वेळी लाटांची उंची खरोखरच साडेपाच मीटर होती काय, अशी विचारणा मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षात करण्यात आल्यावर, "आम्ही लाटांची उंची मोजत नाही' असे उत्तर मिळाले; मात्र हवामान खात्याच्या भाकितानुसार या लाटा तेवढ्या उंचीच्या असल्याचे मानायला हरकत नाही, असा निर्वाळाही तेथील कर्मचाऱ्यांनी दिला.

फेसाळलेल्या लाटांच्या तडाख्यांनी चिंब भिजणारी, बेधुंद झालेली तरुणाई दिसत होती. लाटांच्या तांडवामुळे होणारी हानी टाळण्यासाठी पोलिस, महापालिका यांच्यासह आपत्कालीन व्यवस्था पथकांनाही सतर्क करण्यात आले. आठवडाभरापासूनच याबाबत दक्षतेचा इशारा दिला जात होता; मात्र आज दिवसभर पावसाने उघडीप घेतल्याने समुद्रकिनाऱ्यावर लाटांचा रुद्रावतार पाहण्यासाठी हजारो मुंबईकरांनी गर्दी केली. गेट-वे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, वरळी चौपाटी, वांद्रे बॅण्ड स्टॅंड, दादर चौपाटी येथील किनाऱ्यावर गोळा झालेली तरुणाई लाटांच्या तुषारांनी चिंब भिजत धम्माल उडविताना दिसत होती. गेट-वे ऑफ इंडिया आणि नरिमन पॉईंट येथील सुरक्षा भिंतींना थडकून उंचच उंच उडणाऱ्या लाटांवर स्वार होत पोहण्याची मौज काही धाडसी तरुण घेताना दिसत होते.

सातत्याने उसळत असलेल्या लाटांपासून नागरिकांना लांब ठेवण्याकरिता पोलिसांनी समुद्रकिनाऱ्यांपासून दहा मीटर अंतरावर दोरखंड लावून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र वरळी सीफेस, बॅण्ड स्टॅंडसह सर्वच ठिकाणी पोलिसांचे निर्बंध झुगारून नागरिक लाटांचे तुषार अंगावर उडवून घेण्यात दंग होते. महाविद्यालयीन विद्यार्थी अन्‌ प्रेमी युगुलांचाही यात समावेश होता.

किनाऱ्यावर कहर
कफ परेड, कुलाबा येथील समुद्रकिनाऱ्यांवर मात्र या लाटांनी अक्षरशः कहर केला. समुद्रालगत वर्षांनुवर्षे असलेल्या झोपडीवजा घरांना या लाटांनी तडाखे दिले. समुद्राचे उसळणारे पाणी बधवार पार्क येथे असलेल्या शिवसृष्टी मच्छीमारनगरातील घरांतही शिरले. येथील पन्नासहून अधिक घरांत हे पाणी शिरल्याने याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी आपली घरे रिकामी केली होती. घरात गुडघाभर साचलेले पाणी काढण्याकरिता येथील नागरिक दुपारी उशिरापर्यंत प्रयत्न करीत होते. असाच प्रकार कफ परेड येथील गीतानगर येथेही दिसत होता. लाटांच्या पाण्यामुळे येथील घरांत सहा फुटांहून अधिक पाणी साचले होते. हे पाणी काढण्याकरिता मुंबई महापालिकेने अवघे तीन पंप लावल्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत होता. कुलाबा येथील भाई बांदल मच्छीमारनगर, शिवशक्तीनगर, सीतानगर या ठिकाणी लाटांच्या तडाख्यामुळे नुकसान झालेल्या रहिवाशांच्या भोजन; तसेच निवाऱ्याची व्यवस्था शिवसेना दक्षिण- मुंबई विभागामार्फत नजीकच्या बालवाडी आणि शिवसेना शाखेत करण्यात आली होती.



(sakaal, 24 th july)

No comments: