जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण
पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र असल्याचे सिद्ध करण्याकरीता मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील आरोपी मोहम्मद अजमल कसाब याच्यावर सुरू असलेला खटला महत्त्वपूर्ण असल्याचे वक्तव्य गृहमंत्री जयंत पाटील यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना केले. महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या समुद्रकिनाऱ्यावरील राज्यांना अतिरेकी हल्ल्याचा आलेला गुप्तचर खात्याचा अहवाल "रुटीन' आहे. मात्र, यासंबंधी पोलिसांना दक्षतेचा इशारा देण्यात आल्याचेही पाटील यावेळी म्हणाले.
आझाद मैदान पोलिस क्लब येथे आयोजिलेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. पश्चिमी सागरी किनाऱ्यावरील राज्यांना अतिरेकी हल्ल्याचा धोका असल्याचा अहवाल "आयबी'कडून प्राप्त झाला. पोलिस आणि अन्य गुप्तचर यंत्रणांनी दक्ष राहावे यासाठी अशाप्रकारचे "ऍलर्ट' नेहमीच येत असतात. मात्र, काही वेळेला या अहवालाची माहिती प्रसिद्धिमाध्यमांकडे पोचत असल्याने त्यातून सामान्य जनतेत घबराट पसरत असल्याचे पाटील म्हणाले. गुप्तचर खात्याकडून मिळणाऱ्या अहवालाची नेहमीच गंभीर दखल घेऊन त्याप्रमाणे चोख सुरक्षा व्यवस्था ठेवत दक्षता बाळगली जाते, असेही त्यांनी सांगितले. येत्या काळात अतिरेकी हल्ला कसा होईल याचा अंदाज बांधता येत नाही, हे 26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्याने सिद्ध झाल्याचेही पाटील यावेळी म्हणाले.
मुंबई हल्ल्याचा कट पाकिस्तानच्या जमिनीवर रचला गेला. हा हल्ला करणारे फिदायीनदेखील पाकिस्तानीच होते. पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र ठरविण्यासाठी ही नामी संधी आहे. त्यामुळे या हल्ल्याच्या वेळी पोलिसांनी अटक केलेला अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्यावर सुरू असलेला खटला महत्त्वाचा आहे, असेही गृहमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले. या हल्ल्याच्या वेळी मुंबई पोलिसांनी दाखविलेले धाडस अतुलनीय असल्याचा उच्चारही त्यांनी केला. मुंबई पोलिस दलाचे एक पथक नुकतेच इस्त्रायल येथे गेले आहे. यापुढील काळात पोलिस अधिकाऱ्यांची अशीच पथके प्रशिक्षणासाठी अमेरिका, इंग्लंड आणि चीन येथेही पाठविली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
गुन्हेगारीचे विश्व गेल्या काही वर्षांपासून बदलत आहे. गुन्हेगारीचा प्रवास आता दहशतवादाकडेही होत असताना प्रसिद्धिमाध्यमांनी वाईट गोष्टींचे उदात्तीकरण करू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी भाषणात दिला.
मुंबईत सुरक्षा वाढविली
जम्मू येथे एका संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तरुणाकडे सापडलेल्या लॅपटॉपमध्ये मुंबई, नवी मुंबईतील रेल्वे स्थानके आणि चेन्नई येथील महत्त्वपूर्ण ठिकाणांची छायाचित्रे तसेच महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत दक्षतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती गृहखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या इशाऱ्यानंतर शहरातील प्रमुख ठिकाणांवरील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती.
(sakaal, 15 th july)
No comments:
Post a Comment