Thursday, July 30, 2009

पोलिस महासंचालक विर्क यांना मुदतवाढ

केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशी असलेली जवळीक आणि अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत केलेल्या उल्लेखनीय कामांच्या जोरावर राज्याचे पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला. विर्क यांच्या निवृत्तीनंतर या पदावर आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी लावण्यावरून राज्यातील सत्ताधारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले काही दिवस सुरू असलेले मतभेद विर्क यांना मिळालेल्या मुदतवाढीनंतर शमले आहेत. येत्या 31 जुलै रोजी विर्क निवृत्त होणार होते.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने यंदा 13 मार्च रोजी विर्क यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्ती केली. नेमणुकीनंतर विर्क यांना अवघ्या चार महिन्यांचा कालावधी मिळाला. यापूर्वी पंजाबमध्ये पोलिस महासंचालक म्हणून काम केलेल्या विर्क यांनी तेथे मोडून काढलेला दहशतवाद तसेच आगामी काळात राबवायच्या नक्षलविरोधी अभियानाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना मुदतवाढ मिळण्यास महत्त्वपूर्ण ठरल्याचे बोलले जाते. ऑक्‍टोबर अखेरपर्यंत काम करण्याची संधी मिळालेल्या विर्क यांच्या कार्यकाळातच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. ऑक्‍टोबर महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पोलिस महासंचालकपदावर आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी लागावी यासाठी सत्ताधारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तीव्र मतभेद झाले होते. विर्क यांच्या निवृत्तीनंतर या पदावर ए. एन. रॉय यांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आग्रही होता. त्यानंतर मात्र निवृत्तीच्या दारात असलेल्या विर्क यांनी दिल्लीत असलेल्या आपल्या जुन्या संपर्काच्या जोरावर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींच्या गाठीभेटी घेतल्या. यानंतरच त्यांना या पदावर तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यास हिरवा कंदील मिळाल्याचे अंतर्गत गोटातून सांगण्यात येते. राज्याचे मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांना नुकतीच सरकारने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. मुख्य सचिवांना मुतदवाढ दिली जात असेल तर पोलिस महासंचालकांच्या बाबतीत दुजाभाव केला जाऊ नये, अशी भूमिका घेत सरकारने विर्क यांच्या मुदतवाढीला हिरवा कंदील दाखविला.
मूळचे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी असलेल्या विर्क यांची बॅच 1970 ची आहे. केंद्र सरकारच्या प्रतिनियुक्तीवर गेल्यानंतर 23 वर्षे ते पंजाबमध्ये कार्यरत होते. पंजाबमध्ये त्यांना पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली अटकही झाली होती; मात्र कायदेशीर लढाई लढत या सर्व आरोपांतून ते निर्दोष मुक्त झाले. सध्या महाराष्ट्राचे तेहतीसावे पोलिस महासंचालक म्हणून कार्यरत असलेल्या विर्क यांनी मिळालेल्या मुदतवाढीबाबत समाधान व्यक्त केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि गृहमंत्री जयंत पाटील यांनी मुदतवाढ मिळण्यासाठी प्रयत्न केल्याचेही विर्क या वेळी म्हणाले.


काम करीत राहणार ः विर्क

आपल्या सेवेच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण काम करीत राहणार आहोत. मुदतवाढ मिळाल्यानंतर येत्या काळात दहशतवाद आणि नक्षलवादाला आळा घालण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले जाणार असल्याची प्रतिक्रिया पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी व्यक्त केली. फोर्सवन, शीघ्र कृती दल आणि दहशतवादविरोधी पथकात सुधारणा घडवून आणण्यासाठी येत्या काळात पावले उचलली जाणार आहेत. ही तिन्ही दले अधिक सक्षम करीत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नव्याने प्रयत्न करणार आहोत. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत कमी होत आहे. गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम स्थापण्यात येणार असल्याचेही विर्क यांनी सांगितले.


(sakaal,29 th july)

No comments: