Thursday, July 16, 2009

मुंबईच्या अंडरवर्ल्डवर नव्या टोळीचे राज्य?





दाऊद, छोटा राजनचे फुटीर एकत्र येण्याची शक्‍यता


कधी काळी मुंबईच्या अंडरवर्ल्डवर राज्य करणाऱ्या दाऊद आणि छोटा राजन या टोळ्यांना दुहीने ग्रासले आहे. अनेक वर्षे दोन्ही टोळ्यांकरिता काम केल्यानंतर कामाचा योग्य मोबदला न मिळाल्याने दाऊद आणि छोटा राजनचे प्रमुख साथीदार आता या टोळ्यांतून बाहेर पडून आपली वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहेत.
वेगवेगळ्या टोळ्यांसाठी काम करताना कधी काळी एकमेकांच्या जीवावर उठलेले हे कुख्यात गुंड आगामी काळात मुंबईवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नवीन टोळीच्या रूपाने एकत्र येण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.
मुंबईच्या अंडरवर्ल्डचा कणा मोडल्याचा दावा पोलिस कितीही करीत असले तरी येथील गुन्हेगारी जगतावर दाऊद आणि छोटा राजन या टोळ्यांचे वर्चस्व अद्याप कायम आहे. रिअल इस्टेटपासून चित्रपट क्षेत्र अशा सर्वच क्षेत्रांत या दोन्ही टोळ्यांची आजही तेवढीच दहशत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या टोळ्यांत काहीही आलबेल नसल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने "सकाळ'ला दिली. बॅंकॉकमधून आपल्या टोळीची सूत्रे हलविणाऱ्या छोटा राजनला प्रकृती साथ देत नसल्यामुळे त्याचे आपल्या टोळीकडे फारसे लक्ष नाही. त्याचे विश्‍वासू साथीदार भरत नेपाळी व विकी मल्होत्रा यांनी टोळीतून फुटलेल्या डी. के. राव याच्या पावलावर पाऊल ठेवत समांतर टोळी चालविण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत बऱ्यापैकी बस्तान बसवीत असलेल्या हेमंत पुजारी आणि रवी पुजारी या टोळ्यांची त्यांना चांगलीच मदत मिळत आहे. डी. के. रावपाठोपाठ विकी मल्होत्रानेही छोटा राजनचे ऐकणे सोडून दिले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीतही नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दाऊदचा विश्‍वासू साथीदार छोटा शकील आणि लहान भाऊ अनिस इब्राहिम यांच्यात टोळीची सूत्रे हातात घेण्यावरून चांगलाच वाद आहे. पाकिस्तानमधून भारत आणि मध्य आशियात कारवाया करणारा दाऊद या दोघांच्या भांडणाने चांगलाच हैराण झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनिस इब्राहिम आणि छोटा राजन या दोघांचे चांगले जमत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली आहे. याशिवाय गुरू साटम आणि छोटा शकील यांच्यातही "तह' झाल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. अंडरवर्ल्डवर वर्चस्व निर्माण करण्याकरिता टोळ्यांची होत असलेली ही फाटाफूट त्यांच्या म्होरक्‍यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.
आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असलेला पूर्वाश्रमीचा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आणि अबू सालेम यांनीही एकमेकांशी जुळवून घेतल्याचे तुरुंगातील सूत्रांकडून समजते. गवळीचा छोटा राजनच्या डी. के. राव याच्याशीदेखील कोणताही सवतासुभा राहिलेला नाही. आर्थर रोड तुरुंगातच डी. के. राव आणि विकी मल्होत्रा यांच्या गुंडांत चांगलीच हाणामारी झाली होती. त्यामुळेच विकी मल्होत्राला कल्याण तुरुंगात ठेवण्यात आले. मुंबईतील तीन प्रमुख टोळ्यांतील या फुटीरांची लवकरच नवी टोळी गुन्हेगारी विश्‍वात उभी राहण्याची शक्‍यता गुन्हे शाखेतील या अधिकाऱ्याने वर्तविली.

(sakaal,10th july)

No comments: