Thursday, July 30, 2009

अबू जुंदलच्या अस्तित्वाबद्दल पोलिसांमध्ये साशंकता

मुंबईवरील अतिरेकी हल्लाप्रकरणी पोलिसांच्या हाती जिवंत सापडलेला अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याने गुन्ह्याची कबुली देताना त्याला हिंदी शिकविणाऱ्या अबू जुंदल नावाच्या भारतीयाचे नाव घेतले असले तरी अशी व्यक्तीच अस्तित्वात असण्याबाबत पोलिस साशंक आहेत. कसाबने आजवर दिलेल्या कबुलीजबाबात अशा कोणा व्यक्तीचा यापूर्वी कसलाच उल्लेख झालेला नाही. कसाबने आतापर्यंत न्यायालयात सगळेच सत्य सांगितलेले नाही. या प्रकरणात त्याच्याकडून आणखी बरेच सत्य बाहेर येणे बाकी असल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले.

अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याने आपला गुन्हा कबूल करून शिक्षा देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. कसाबने न्यायालयात दिलेल्या कबुलीनाम्यात अबू जुंदल याचे नाव पहिल्यांदाच घेतले. यापूर्वी कसाबच्या झालेल्या चौकशीत त्याने अशा कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतले नव्हते. याशिवाय न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे दिलेल्या कबुलीजबाबातही त्याने अशा कोणत्याही व्यक्तीने त्याला हिंदी शिकविल्याचे स्पष्ट केले नव्हते. कसाबने सांगितलेल्या अबू जुंदलबाबत पाकिस्तानकडे विचारणा करण्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर बोलताना मारिया यांनी लवकरच योग्य ती पावले उचलली जातील, असे सांगितले. कसाब याने केलेल्या गुन्ह्याची न्यायालयात कबुली दिली असली तरी त्याने बऱ्याच बाबी न्यायालयात स्पष्ट करणे बाकी आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली नसती तरी आमच्याकडे त्याच्याविरुद्ध असलेले सबळ आणि भक्कम पुरावे त्याला शिक्षा होण्यासाठी पुरेसे आहेत. त्याच्या कबुलीमुळे या खटल्याच्या निकालासाठी चांगलीच मदत होईल असेही ते म्हणाले. कसाबच्या कबुलीनंतर या प्रकरणी सरकारी पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि ज्येष्ठ विधीतज्ञांची मदत घेतली जाईल असेही मारिया यावेळी म्हणाले.


(sakal,21 st july)

No comments: