Thursday, July 30, 2009

कसाबला फासावर चढवा; दोषी अधिकाऱ्यांनाही शिक्षा द्या

शहीद विजय साळसकर यांच्या पत्नीची मागणी

"मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याने आज न्यायालयात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली, ही काही आनंदोत्सव साजरा करण्यासारखी बाब नाही. कारण सबंध जगाला तो गुन्हेगार असल्याचे माहिती आहे. त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा दिली जावी, तसेच ज्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हा हल्ला घडला, त्या दोषी अधिकाऱ्यांनाही शिक्षा करण्यात यावी,' अशी प्रतिक्रिया अतिरेक्‍यांचा मुकाबला करताना शहीद झालेले खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय साळसकर यांच्या पत्नी स्मिता साळसकर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली आहे.

मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी पोलिसांच्या हाती जिवंत सापडलेला एकमेव अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्यावर विशेष न्यायालयात खटला सुरू आहे. आज खटल्याच्या सुनावणीच्या वेळी कसाब याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. याबाबत प्रतिक्रिया देताना स्मिता साळसकर यांनी कसाबला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.

स्मिता साळसकर म्हणाल्या की, "पाकिस्तान हे राष्ट्र समझोता करून सुधारणा होणाऱ्यातले नाही. या राष्ट्राचा आणि तेथील अतिरेक्‍यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पावले उचलायला हवीत. त्याशिवाय आम्हा शहिदांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला, असे म्हणता येणार नाही. भारतावर वेळोवेळी पाकिस्तानकडूनच हल्ला झालेला आहे. त्यांच्याशी समझोत्याची भाषा करणे चुकीचेच आहे. अतिरेकी कसाबने नावे सांगितलेल्या पाकिस्तानमधील त्याच्या साथीदारांवरही कारवाई व्हायलाच हवी.' पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळेच हा प्रकार घडला आहे. त्यांच्या चुकांना पाठीशी घालता येणार नाही. त्यामुळे या प्रकरणात जे अधिकारी दोषी आहेत त्यांनाही शिक्षा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

लवकर फाशी द्या : विनिता कामटे
अतिरेकी मोहम्मद अजमल कसाबने दिलेल्या कबुलीनंतर आता खटल्यात विशेष काही राहिलेले नाही. त्यामुळे त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मुंबई हल्ल्यात अतिरेक्‍यांशी मुकाबला करताना धारातीर्थी पडलेले अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांनी केली. शेकडो निष्पापांना प्राण गमवावे लागलेल्या या हल्ल्याने झालेले नुकसान भरून येण्यासारखे नाही, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.


-----

कसाबच्या कबुलीने कायदेशीर अडचणच : वाय. पी. सिंग

आंतरराष्ट्रीय कट; अन्य सहआरोपींविरुद्ध खटला सुरूच राहणार

मुंबई हल्ल्यातील आरोपी अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली असली, तरी त्याचा खटल्यावर काही विशेष परिणाम होणार नाही. हा एक आंतरराष्ट्रीय कट असल्याने त्याच्या कबुलीनंतर उलट कायदेशीर अडचण निर्माण झाली आहे. अन्य सहआरोपींकरिता हा खटला सुरूच राहील, असे मत माजी आयपीएस अधिकारी व विधीज्ञ वाय. पी. सिंग यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.

अतिरेकी कसाब तसेच या हल्ल्याच्या मास्टर माइंडविरुद्ध पोलिसांकडे सबळ पुरावे उपलब्ध आहेत, त्यामुळे कसाबला फाशीची शिक्षा होणे निश्‍चित आहे; मात्र या प्रकरणातील आरोपींची संख्या मोठी असल्याने त्यांच्यावर या कबुलीचा फारसा प्रभाव पडणार नाही, असे वाय. पी. सिंग यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, "कसाबने दिलेली कबुली न्यायालय ग्राह्य धरेल; मात्र अन्य आरोपींकरिता हा खटला सुरू ठेवला जाईल. कसाबच्या कबुलीनंतर पाकिस्तानवरील दबावही वाढेल. पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र असल्याने कसाबच्या कबुलीचा तेथे सुरू असलेल्या खटल्यावरही परिणाम होणार नाही. ते त्यांच्या पद्धतीने खटला चालवतील. भविष्यात पाकिस्तानने भारताला बाजू मांडण्याची संधी दिल्यावर मात्र या कबुलीचा परिणाम तेथील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावर होऊ शकेल.'

कोणत्याही खटल्यात उपलब्ध पुराव्यांनुसार आरोपीला शिक्षा होते. भारताकडे कसाब, त्याचे साथीदार अतिरेकी आणि पाकिस्तानातून त्यांना सूचना देणारे लष्कर ए तय्यबाचे कमांडर यांच्याविरुद्ध भक्‍कम पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे या खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात येईल, असे मत वाय. पी. सिंग यांनी व्यक्‍त केले.


(sakaal, 20 th july)

No comments: