Thursday, July 16, 2009

पश्‍चिम रेल्वेवरील स्थानकांवर घातपाताची शक्‍यता

केंद्रीय गुप्तचरांची माहिती; मुंबईत दक्षतेचा इशारा

पश्‍चिम रेल्वेमार्गावरील स्थानके दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असून, या स्थानकांवर घातपात होण्याची शक्‍यता असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून मिळाल्याने मुंबईत दक्षतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती राज्याचे पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी आज येथे दिली. गुप्तचर खात्याकडून मिळालेल्या सूचनेनंतर मुंबईतील सर्व रेल्वेस्थानकांवरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली.

मुंबईवर 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या घातपाती हल्ल्यासारखा हल्ला पुन्हा पश्‍चिम समुद्रकिनाऱ्यावर गुजरात, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांत होण्याची शक्‍यता "आयबी'ने वर्तविली होती. यानंतर केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने आज पुन्हा एकदा दिलेल्या खबरदारीच्या इशाऱ्यामुळे पोलिसांना दक्षतेचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्रीय गुप्तचर खात्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार मुंबईतील रेल्वेस्थानकांवर दहशतवादी कारवायांची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. गुप्तचर खात्याकडून मिळालेल्या या माहितीची खातरजमा करण्यात आली असून, त्यात विशेष असे काहीही आढळले नसल्याचे पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी सांगितले; मात्र नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने पश्‍चिम रेल्वेवरील चर्चगेट, वांद्रे, अंधेरीसह प्रमुख
रेल्वेस्थानकांवरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली असल्याचीही माहिती विर्क यांनी दिली.

आर्थिक राजधानी असलेली मुंबई नेहमीच अतिरेक्‍यांच्या हिटलिस्टवर असल्याने गुप्तचर खात्याकडून प्राप्त होणाऱ्या सूचनेनंतर शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येतो. आठवडाभरापूर्वी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी अरबी समुद्राला लागून असलेल्या गुजरात, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांना दक्षतेचा इशारा देण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. त्यातच आज प्राप्त झालेल्या माहितीनंतर पुरेपूर काळजी घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेल्वेचे पोलिस आयुक्त ए. के. शर्मा यांनी कालपासूनच ही सुरक्षाव्यवस्था वाढविल्याचे सांगितले. 11 जुलै 2006 रोजी झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोट मालिकेच्या घटनेला तीन वर्षे पूर्ण होत असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांत सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी याकरिता स्थानकांच्या सुरक्षिततेत वाढ केल्याचेही शर्मा या वेळी म्हणाले. हा बंदोबस्त आणखी एक आठवडाभर तसाच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


(sakaal,9th july)

No comments: