Wednesday, February 18, 2009

कॉलेज तरुणाची खंडणीसाठी मित्रांकडूनच निर्घृण हत्या

दोघांना अटक ः झटपट पैसे मिळविण्यासाठी अघोरी कृत्य

दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी महाविद्यालयीन तरुणाचे त्याच्या दोन मित्रांनी अपहरण करून, नंतर दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना खार येथे रात्री उशिरा उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी एका विद्यार्थ्याला अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त निसार तांबोळी यांनी दिली. हत्येचे खरे कारण अद्याप कळले नसले तरी कमी वेळेत अधिक पैसे मिळविण्याच्या लालसेतून हा निर्घृण प्रकार झाल्याची शक्‍यता तांबोळी यांनी वर्तविली. दीड वर्षापूर्वी अंधेरी येथील अदनान पत्रावाला या महाविद्यालयीन विद्यार्थ्याची त्याच्याच मित्रांनी दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी केलेल्या हत्येची आठवण करून देणाऱ्या घटनेने पश्‍चिम उपनगरात हळहळ व्यक्त होत आहे.
मुकीम अकबर खान (वय 17) असे या महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे. वांद्रे येथील रिझवी महाविद्यालयात बारावीत शिकणारा मुकीम 13 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास त्याच्या मित्रांकडे गेला तो परतलाच नाही. सायंकाळी उशिरापर्यंत मुकीम घरी न आल्याने खार-पश्‍चिमेला जुना खार येथील निजामुद्दीन इमारतीत राहणाऱ्या त्याच्या आई-वडिलांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. टॅक्‍सी चालविणारे मुकीमचे वडील अकबर खान (55) यांना रात्री उशिरा अनोळखी तरुणांकडून धमकीचा फोन आला. या तरुणांनी दोन लाख रुपयांची मागणी मुकीमच्या वडिलांकडे केली. या प्रकाराने घाबरलेल्या मुकीमच्या वडिलांनी 14 फेब्रुवारी रोजी खार पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. मुकीमचा शोध सर्वत्र सुरू असतानाच पोलिसांनी त्याच्या मित्रांचीही चौकशी करायला सुरुवात केली. खार-पूर्वेला इंदिरानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या अमीर सिद्दीक शेख (वय 19) याची चौकशी केली असता, पोलिसांना त्याची उत्तरे संशयास्पद वाटू लागली. पोलिसांनी आमीरवर लक्ष केंद्रित करून, त्याची कसून चौकशी करायला सुरुवात करताच त्याने काल रात्री गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केल्याचे पोलिस उपायुक्त निसार तांबोळी यांनी सांगितले. रिझवी महाविद्यालयात मुकीमसोबतच शिकणाऱ्या अमीर शेख व त्याचा आणखी एक मित्र यांनी हा कट रचला. मुकीमच्या दुसऱ्या मित्राची चौकशी सुरू असल्याचे तांबोळी यांनी सांगितले.
आमीरने रात्री उशिरा भारतीय कॉलेजच्या मागील बाजूला नाल्यात फेकून दिलेला मुकीमचा मृतदेह पोलिसांना दाखविला. दगड व हातोड्याने ठेचून ठार मारलेल्या मुकीमचा मृतदेह त्याने लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून टाकला होता. कुजलेल्या अवस्थेत असलेला हा मृतदेह ओळखणे पोलिसांना दुरापास्त झाले होते. महाविद्यालयाच्या ओळखपत्रावरून त्याची ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी आज दुपारी सरफराज शेख (17) या आणखी एका बारावीच्या विद्यार्थ्याला अटक केल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक जयचंद्र काठे यांनी दिली. या प्रकरणातील पहिला आरोपी अमीर सिद्दीक शेख याला 2 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे श्री. काठे म्हणाले.


(sakal,18 feb)

No comments: