Monday, February 23, 2009

कसाबवर उद्या आरोपपत्र

काम अंतिम टप्प्यात : मजकूर मराठी, हिंदी, इंग्रजीसह उर्दूतही

मुंबई हल्ल्यातील अतिरेकी महम्मद अजमल कसाबवर बुधवारी (ता. 25) दुपारपर्यंत किल्ला न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. आरोपपत्रातील मजकूर अतिरेकी कसाब याला समजावा यासाठी हे आरोपपत्र मराठी, इंग्रजी, हिन्दीसह उर्दू भाषेतही तयार करण्यात येत आहे. उर्दूतील आरोपपत्राचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मुंबई हल्ल्यातील अतिरेकी कसाब सध्या 26 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे. मुंबई हल्ला प्रकरणात कसाबवर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची 90 दिवसांची मुदत बुधवारी संपत आहे. या मुदतीपूर्वी गुन्हे शाखेचे पोलिस न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या आरोपपत्रात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत यासाठी कायदेतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आरोपपत्र बनविण्याचे काम सुरू आहे. आरोपपत्र तयार करण्याचे काम उद्या पूर्ण होईल. त्यानंतर केव्हाही ते किल्ला न्यायालयात सादर करता येईल. मात्र, ते येत्या बुधवारीच दाखल करण्यावर पोलिसांचा कल राहणार आहे. यासंबंधी गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांची विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज भेट घेतली.
या अतिरेकी हल्ल्याप्रकरणी अटक केलेले लष्कर-ए तैयबाचे अतिरेकी फहीम अन्सारी आणि सबाऊद्दीन यांचादेखील या कसाबच्या आरोपपत्रात सहआरोपी म्हणून समावेश असेल. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या कसाबचा कलम 164 अंतर्गत न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर कबुली जबाब पूर्ण झाला आहे. त्यासाठी त्याला किल्ला न्यायालयात नेण्यात आले होते. याशिवाय कसाबला ओळखणाऱ्यांची ओळख परेडही घेण्यात आली. सध्या फहीम अन्सारी आणि सबाऊद्दीनचा कबुली जबाब घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली. या आरोपपत्रात पाकिस्तानमध्ये असलेल्या फरारी अतिरेक्‍यांच्या नावांचाही उल्लेख करण्यात येणार आहे.
दरम्यान, मुंबई हल्ल्याच्या कटात लष्कर-ए-तैयबा आणि पाकिस्तानच्या कटातील सहभागासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती कसाबच्या कबुलीजबाबात उघडकीस आली आहे. कसाबच्या जिवाला धोका असल्याने त्याच्यासंबंधीचे आरोपपत्र दाखल करताना त्याला न्यायालयात हजर करणार अथवा नाही याबाबत काहीही सांगण्यास गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी नकार दिला. सध्या गुप्त ठिकाणी ठेवण्यात आलेल्या कसाबवर मुदत पूर्ण होण्यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले जाईल. मुंबई हल्ला प्रकरणात अटक केलेले फहीम अन्सारी आणि सबाऊद्दीन या दोघांवर बारा गुन्हे दाखल करणार असल्याचेही मारिया या वेळी म्हणाले.

(sakal,23 feb)

No comments: