Wednesday, February 11, 2009

मद्यपी चालकाच्या कारमधून प्रवास केल्यास कारावास!

पोलिसांची कारवाई ः पहिल्या गुन्ह्याची नोंद

दारू पिऊन कार चालविणाऱ्या मित्राच्या कारमध्ये बसणे धोकादायक असून यापुढे हा गंभीर गुन्हा ठरणार असून या गुन्ह्यापोटी कारावासाची शिक्षाही होऊ शकते. मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी आता अशा वाहनचालकासोबत कारमध्ये बसलेल्या सहप्रवाशांवरही कारवाई करायला सुरुवात केली आहे. चालकाने मद्यप्राशन केल्याची माहिती असतानाही त्याच्यासोबत कारमध्ये बसलेल्या सहप्रवाशाला वाहनचालकाप्रमाणेच दोन हजार रुपये दंड आणि एक दिवसाच्या कारावासाची शिक्षा आज न्यायालयाने ठोठावली. सहप्रवाशाला शिक्षा होण्याची ही पहिलीच घटना असल्याची माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त हरीश बैजल यांनी दिली.
मुलुंडमधील मॉडेला चेकनाका येथे मारुती स्विफ्ट गाडीतून जाणारा योगेश भोईर (21) आणि त्याचा सहप्रवासी लोकेश घोलप (22) या दोघांवर वाहतूक पोलिसांनी 4 फेब्रुवारी रोजी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत कारवाई केली. ठाण्यात घंटाळी नाका येथे राहणाऱ्या योगेश भोईर याने मद्यप्राशन केल्याची कल्पना असतानाही लोकेश तो चालवीत असलेल्या कारमध्ये बसला होता. या आरोपाखाली वाहतूक पोलिसांनी योगेशसोबत लोकेश यालाही सहआरोपी करून घेतले. या दोघांना आज सकाळी न्यायालयासमोर हजर करण्यात आले तेव्हा न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची साधी कैद आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. मोटार वाहतूक कलम 188 प्रमाणे सहप्रवाशावर करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई आहे. मोटरसायकल आणि चारचाकी वाहनांकरिता यापुढे असेच निकष लावण्यात येणार असल्याचे हरीश बैजल यांनी सांगितले.


(sakal,12 feb)
----

No comments: