Wednesday, February 18, 2009

लग्नाला नकार दिल्याने विवाहितेवर चाकूहल्ला

प्रेम प्रकरण ः नौदल अधिकाऱ्याला अटक

विवाहाला ऐनवेळी नकार देणाऱ्या नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीवर चाकूने सपासप वार करणाऱ्या नौदलातील वायरलेस रेडिओ ऑफिसरला कफपरेड पोलिसांनी अटक केली असून, त्याला 20 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली नौदल अधिकाऱ्याची पत्नी आयएनएस अश्‍विनी रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती स्थिर आहे.

कफ परेड येथील नौदल कॉलनीत राहणाऱ्या रवी चंद्रन (30) या नौदल अधिकाऱ्याचे नौदलातच अधिकारी असलेल्या धरमपाल सिंग (39) यांची पत्नी अनिता हिच्याशी प्रेम प्रकरण होते. या प्रेम प्रकरणातून धरमपाल सिंग यांच्या घरात वाद होत असत. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अनिता रवी चंद्रन याच्यासोबत नवा संसार थाटणार होती. मात्र तिचा पती धरमपाल याने केलेल्या विनवणीनंतर तिने हा विचार बदलला होता. लग्नाला ऐनवेळी नकार दिल्याने संतापलेल्या रवी चंद्रन याने शनिवारी अनिताच्या घरी जाऊन पती घरात असतानाच तिच्यावर चाकूचे वार केले. यानंतर स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पत्नी अनिता आणि रवी चंद्रन यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती असल्याने धरमपाल सिंग याने नौदल पोलिसांत तक्रार दिली होती. या घटनेनंतर पोलिसांनी रवी चंद्रन याला अटक केली असून न्यायालयाने त्याला 20 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक विलास भोळे यांनी दिली.

( sakal,16 feb)

No comments: