"एमएमआरडीए'च्या पुनर्वसन आणि पुनर्वसाहतप्रमुख वंदना सूर्यवंशी यांना लाखो रुपये देऊनही त्यांनी कामे न केल्याने तणावाखाली आलेल्या एका व्यक्तीने शुक्रवारी दुपारी वांद्रे येथील "एमएमआरडीए' कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. संतोष प्रभाकर भोसले (43) असे त्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांना त्याच्या खिशात एक चिठ्ठी मिळाली असून या चिठ्ठीत सूर्यवंशी यांच्यावर आरोप करण्यात आले असल्याचे वांद्रे-कुर्ला संकुल पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आर. पी. परेरा यांनी सांगितले. याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचेही परेरा या वेळी म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे राहणाऱ्या संतोषने एमएमआरडीए आणि म्हाडाची अडकलेली कामे करून देतो असे सांगून अनेकांकडून पैसे घेतले होते. काल दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पैसे घेतलेल्या लाभार्थींना कामे पूर्ण झाल्याचे सांगून त्याने एमएमआरडीए कार्यालयात बोलावले. भेटायला आलेल्या लोकांना घेऊन तो एमएमआरडीएच्या कॅन्टीनमध्ये गेला. त्यांच्याशी बोलत असतानाच तो चक्कर येऊन खाली पडला. या प्रकाराने एमएमआरडीए कॅन्टीनमध्ये एकच गोंधळ उडाला. सुरुवातीला त्याला फिट आली असावी असे समजून नागरिकांनी त्याच्यावर उपचार करायला सुरुवात केली. प्रकृती अधिकच खालावत असल्याने त्याला भाभा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्यापूर्वीच तो मरण पावला. पोलिसांना त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीत लोकांची कामे करण्याकरिता एमएमआरडीएच्या पुनर्वसन आणि पुनर्वसाहतप्रमुख असलेल्या वंदना सूर्यवंशी यांना लाखो रुपये दिले; मात्र अनेकदा विचारणा करूनही त्यांनी कोणतीच कामे न केल्याने तणावाखाली येऊन आपण आत्महत्या करीत असल्याचे त्याने या पत्रात नमूद केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत सूर्यवंशी यांची चौकशी करायला सुरुवात केली आहे. चिठ्ठीत नमूद केल्याप्रमाणे भोसले याने वंदना सूर्यवंशी यांना लाखो रुपये दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक परेरा यांनी दिली. आज संतोष भोसले याचा मृतदेह त्याच्या डोंबिवली येथे राहणाऱ्या भावाच्या ताब्यात देण्यात आला.
(sakal, 14 feb)
No comments:
Post a Comment