Friday, February 27, 2009

50 रुपयांत करा मनमुराद वायुप्रदूषण!

पीयूसी प्रमाणपत्र : "सकाळ'ने केलेल्या पाहणीचा धक्कादायक निष्कर्ष

वाहनांच्या वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी राज्य परिवहन विभागाचे सक्तीचे असलेले "पीयूसी' प्रमाणपत्र अवघ्या काही रुपयांसाठी कोणत्याही प्रकारची तपासणी न करता सर्रास दिली जात आहेत. हा धक्कादायक प्रकार "सकाळ'ने केलेल्या एका पाहणीत उघडकीस आला. 15 वर्षांहून अधिक काळ झालेल्या आणि मोठ्या प्रमाणावर वायुप्रदूषण करणाऱ्या जुनाट वाहनांनाही हे प्रमाणपत्र सहज मिळत असल्याने हा प्रकार पर्यावरणाच्या हानीसाठी सर्वाधिक कारणीभूत ठरत आहे. याबाबत राज्य परिवहन खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली.

सव्वा कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईच्या रस्त्यांवर दिवसाला दीड लाखांहून अधिक वाहने धावतात. वाहनांच्या धुरातून निघणाऱ्या कार्बन मोनोक्‍साईड, नायट्रोजन ऑक्‍साईड, सल्फर डायऑक्‍साईड यांसारख्या घटकांमुळे मोठ्या प्रमाणावर वायुप्रदूषण होते. पर्यावरणात असमतोल निर्माण करणारे हे घटक मानवी आरोग्यालाही मोठा धोका निर्माण करीत असतात. वाहनांच्या धुरातून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार, तसेच राज्य परिवहन विभागानेही कठोर नियम केले आहेत. रस्त्यावरून धावणारे वाहन "प्रदूषण नियंत्रित' असल्याचे प्रमाणपत्र (पीयूसी) वाहनचालकाने सोबत बाळगणे कायद्याने बंधनकारक आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरांत पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांसाठी ठिकठिकाणी पीयूसी वितरित करणारी फिरती केंद्रे उभी करण्यात आली आहेत. वाहनांना देण्यात येणाऱ्या या प्रमाणपत्रांसाठी दुचाकी वाहनांना प्रत्येकी 30 रुपये; तर चारचाकी वाहनांना 50 रुपये आकारले जातात. पीयूसी नसल्यास वाहनचालकाला राज्य परिवहन विभागाकडून एक हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.

रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांच्या धुरातील प्रदूषण करणाऱ्या घटकांचे प्रमाण नीट तपासून वाहनचालकाला त्यासंबंधीचे प्रमाणपत्र देणे अपेक्षित आहे, मात्र "सकाळ'ने केलेल्या पाहणीत वाहनांच्या धुराची कोणत्याही प्रकारची तपासणी न करता केवळ अंदाजे ही प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे निदर्शनास आले. पीयूसी केंद्रांवर सुरू असलेला हा अनागोंदी कारभार उघडकीस आणण्यासाठी एका जुनाट बजाज स्कूटीची एकाच दिवशी पाच वेगवेगळ्या ठिकाणी पीयूसी प्रमाणपत्रे काढण्यात आली. पाचही ठिकाणी या स्कूटीला देण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर धुरातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषकांचे प्रमाण वेगवेगळे नमूद करण्यात आले. तीन ठिकाणी तर स्कूटीच्या धुरातील प्रदूषकांची कोणत्याही प्रकारची तपासणी झाली नाही. पीयूसी केंद्रांवर सुरू असलेल्या या प्रकाराने वाहनचालकांना अवघ्या 50 रुपयांत सहा महिने मनमुराद वायुप्रदूषण करण्याचा जणू परवानाच उपलब्ध होतो. त्यामुळे अनेकदा वाहतूक पोलिसांना या वाहनचालकांवर कोणतीच कारवाई करता येत नाही.
याबाबत राज्य परिवहन खात्याचे आयुक्त दीपक कपूर यांच्याशी संपर्क साधला असता, कलकत्ता येथे सरकारी कामानिमित्त आल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत अंमलबजावणी विभागाचे उपायुक्त अरुण भालचंद्र यांच्याशी कार्यालयात दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते बैठकीत व्यग्र असल्याचे सांगण्यात आले.
...............


अशी झाली पीयूसी केंद्रांविरुद्धची मोहीम

आम्ही रस्त्यावर चालविण्यास अयोग्य आणि धुरावाटे प्रचंड प्रदूषण करणारी 15 वर्षांपूर्वीची एक जुनाट कायनेटिक स्कूटी घेतली. या स्कूटीची गावदेवी येथील केंद्रात पीयूसी काढायला गेलो. त्या वेळी तेथील कर्मचाऱ्याने ही गाडी चालविण्यायोग्य नसल्याने सांगून त्यातून मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडत असल्याचे सांगितले, मात्र जराशी घासाघीस केल्यानंतर त्याने या गाडीची खरी पीयूसी दिली. त्यानुसार ही गाडी पर्यावरणाच्या दृष्टीने रस्त्यावर चालविण्यास अयोग्य असल्याचे प्रमाणपत्रच आम्हाला मिळाले.
यानंतर आमची पीयूसी केंद्रांवर सुरू असलेला अनागोंदी कारभार उघडकीस आणणारी मोहीम सुरू झाली. आम्ही ही प्रदूषणकारी गाडी घेऊन परळ येथे गेलो. तेथील फिरत्या पीयूसी केंद्रावर या गाडीची पीयूसी काढली. त्या वेळी आम्हाला ही गाडी प्रदूषण नियंत्रित असल्याची पीयूसी देण्यात आली. या पीयूसीवर कार्बन मोनॉक्‍साईडचे प्रमाण 0.03 असे दाखविण्यात आले.
यापुढे आम्ही शीव येथे पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर गेलो. तेथील पीयूसी केंद्रावर कोणत्याही प्रकारची तपासणी न करता पीयूसी देण्यात आली. त्यात कार्बन मोनॉक्‍साईडचे प्रमाण 1.08 असे नमूद करण्यात आले. पुढे आम्ही आमचा मोर्चा वांद्रे येथील पीयूसी केंद्रावर वळविला. तेथील कर्मचारी गाडीची तपासणी न करताच पीयूसी देत होता, मात्र या कर्मचाऱ्याला समजावून सांगितल्यानंतर त्याने गाडीची तपासणी करून पीयूसी दिली. यात कार्बन मोनॉक्‍साईडचे प्रमाण 1.07 आढळले. पुढे आम्ही माहीम रेल्वेस्थानकालगत असलेल्या पीयूसी केंद्रात गेलो. तेथील कर्मचाऱ्याने कोणतीही तपासणी न करता पीयूसी दिली. त्यात कार्बनचे प्रमाण 1.04 असे आढळले. एकंदरीतच पाच ठिकाणी आम्ही केलेल्या पाहणीत प्रत्यक्ष तपासणीपेक्षा अंदाजे प्रमाण ठरवून पीयूसी देण्यावरच भर देण्यात आल्याचे दिसले.


(sakal, 24 feb)

No comments: