Wednesday, February 11, 2009

कसाबविरुद्ध पाच देशांमध्ये गुन्हे दाखल होणार

तपासासाठी ताबा मागण्याचीही शक्‍यता


अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्यावर फ्रान्स, अमेरिका, सिंगापूर, इटली आणि जपान या देशांत गुन्हे दाखल होणार आहेत. या गुन्ह्यांच्या तपासासाठी हे देश कसाबचा ताबा मागण्याचीही दाट शक्‍यता असल्याची माहिती गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मुंबई हल्ल्यात मरण पावलेल्या 163 नागरिकांत 26 परदेशी नागरिकांचा समावेश होता. या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यापासून हे नागरिक ज्या देशांचे आहेत त्या देशांनी आपली तपास पथके मुंबईत पाठविली. या देशांत अमेरिका, कॅनडा, जपान, फ्रान्स, जर्मनी, मलेशिया, इस्राईल, मेक्‍सिको, इटली, स्पेन, नेदरलॅण्ड, थायलंड, ब्रिटन, सिंगापूर आणि मॉरिशस या पंधरा देशांचा समावेश आहे. या देशांच्या तपास यंत्रणांनी मुंबई हल्ल्याच्या तपासात गुन्हे शाखेच्या पोलिसांना आवश्‍यक असलेली महत्त्वपूर्ण माहिती वेळोवेळी दिली आहे. पंधरा देशांपैकी पाच देशांनी मोहम्मद अजमल कसाबवर गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिले आहेत. मुंबई पोलिसांनी तयार केलेले आरोपपत्र हे देश त्यांच्या खटल्यासाठी वापरण्याची शक्‍यता आहे. तपासासाठी कदाचित कसाबला परदेशवाऱ्याही कराव्या लागतील, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई हल्ल्याकडे सर्व देश वेगळ्या पद्धतीने पाहत असून, त्याचा अभ्यासही करीत आहेत. अशा प्रकारची घटना आपल्या देशात होऊ नये यादृष्टीने काही देशांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना करायलाही सुरुवात केली आहे.
या प्रकरणातील तांत्रिक आणि फॉरेन्सिक बाबींची माहिती जाणून घेण्यासाठी गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त देवेन भारती यांच्या नेतृत्वाखाली
चारसदस्यीय पथक काल रात्री अमेरिकेला रवाना झाले आहे. सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कसाबच्या सुरक्षिततेला मोठ्या प्रमाणावर धोका आहे; मात्र त्याला ठार मारण्यासाठी सुपारी दिल्याची माहिती चुकीची असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.

कसाबला दाऊद टोळीकडून धोका

मुंबई हल्ल्यातील दहशतवादी मोहम्मद अजमल कसाब याच्या जीवाला दाऊद टोळीकडून धोका आहे. तशा स्वरूपाची माहिती गृह मंत्रालयाकडे आल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री प्रकाश जैसवाल यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. याबाबत सुरक्षा यंत्रणा आवश्‍यक ती दक्षता घेत आहेत. सुरक्षा यंत्रणा कसाबच्या संरक्षणासाठी सज्ज असल्याचेही जैसवाल यांनी सांगितले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने ही जबाबदारी त्याची भारतातील सूत्रे संभाळणाऱ्या छोटा शकील याच्यावर सोपविल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी गृहखात्याला दिल्याचे समजते.

(sakal,11 feb)

No comments: