Wednesday, February 18, 2009

कुबेर निघाली परतीच्या प्रवासाला

दहशतवादी हल्ला ः चार खलाशांच्या हत्येचे दुःख


""या सागरात गेली पंचवीस वर्षे मासेमारी करीत आहोत. या पंचवीस वर्षांत कधीच असा बाका प्रसंग आपल्यावर आला नाही. मुंबईवर घातपाती हल्ल्याकरिता वापर झालेली ही बोट पुन्हा पोरबंदरला नेणे आपल्या नशिबी आले आहे. अतिरेक्‍यांनी या बोटीवर काम करणाऱ्या चार खलाशांचे काय केले याचाही पत्ता नाही. झालं ते अतिशय वाईट झालं. मात्र, जुन्या आठवणींना कवटाळून एकाच ठिकाणी थांबता येत नाही. सरकारकडून काही कायदेशीर बाबींची पूर्तता होताच एक-दोन दिवसांत पोरबंदरला रवाना होऊ.'' अतिरेकी हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली एम. व्ही. कुबेर बोट तपास यंत्रणांनी तिच्या मालकाकडे सोपविल्यानंतर ही बोट नेण्यासाठी खास पोरबंदरहून आलेले खलाशी कानजी मसाणी "सकाळ'शी बोलत होते.

26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात वापरण्यात आलेल्या एम. व्ही. कुबेर या मासेमारी बोटीचा तपास पूर्ण झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी ही बोट तिचा मालक विनोदकुमार मसाणी याच्या ताब्यात दिली. मुंबई हल्ल्यातील महत्त्वाचा पुरावा असलेली ही बोट पुन्हा एकदा सागरात मासेमारी करण्यासाठी सज्ज झाली आहे. पोरबंदर येथून पाकिस्तानच्या सागरी हद्दीत गेलेल्या या बोटीला दहा अतिरेक्‍यांनी "हायजॅक' करून तिचा वापर मुंबईवर हल्ला करण्यासाठी केला. हल्ल्याच्या दिवसापासून मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर उभी असलेली ही बोट भाऊचा धक्का येथे उभी करण्यात आली. ही बोट घेऊन जाण्याकरिता पोरबंदर येथून पाच दिवसांपूर्वी चार खलाशी मुंबईत आले आहेत. त्यात कानजी मसाणी आणि त्यांचे सहकारी अरविंद खोडियार यांचा समावेश आहे. मुंबई हल्ल्यात कुबेरच्या झालेल्या वापराबाबत मसाणी यांनी काहीही बोलणे टाळले. मात्र त्या दिवशी बोटीवर असलेल्या पाच खलाशांचे हकनाक जीव गेल्याची वेदना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती. गुजरातच्या समुद्रात शिरताना आता बोटींची कसून तपासणी होते. बोट ताब्यात मिळालेली असली तरी वाटेत नौदल, केंद्रीय सीमाशुल्क विभाग पुन्हा अडवणूक करतील. कोणतीही अडचण नको म्हणून एक-दोन दिवस कायदेशीर बाबी पूर्ण होण्याची आपण वाट पाहत आहोत. बोटीचे मालक विनोदकुमार मसाणी यांना ही माहिती मिळणार आहे. त्यांचा फोन येताच बोट रेवदंडा मार्गे पोरबंदरला निघेल, असे अरविंद खोडियार यांनी यावेळी सांगितले. हवामान चांगले असले तर पोरबंदरला जाण्याकरिता पासष्ट तास लागतात. हवामान खराब असल्यास किती दिवस लागतील याचाही नेम नसतो. सोबतीला पान-मावा आणि बिडी असल्यावर आपण सतत पस्तीस तास बोट चालवू शकतो, असेही मसाणी या वेळी म्हणाले.


(sakal,16 feb)

No comments: