Friday, February 27, 2009

मुंबईवरील हल्ल्यात पाकमधील माजी लष्करी अधिकाऱ्याचा सहभाग

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी पाकिस्तानमधील एका माजी लष्करी अधिकाऱ्याचा सहभाग स्पष्ट झाला आहे. अतिरेक्‍यांच्या चौकशीत या अधिकाऱ्याचे नाव पुढे आले असून, अतिरेकी महम्मद अजमल कसाब याच्यावर उद्या (ता. 25) दाखल होणाऱ्या आरोपपत्रात ही बाब नमूद करण्यात आली आहे. कर्नल कियानी अहमद नावाने असणारा हा अधिकारी म्हणजे पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल अश्‍फाक परवेज कियानी आहेत का, हे सांगण्यास गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिला.
देशाला हादरवून टाकणाऱ्या 26 नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचा दावा पाकिस्तानने वेळोवेळी केला; मात्र अतिरेक्‍यांचा कबुलीजबाब, तसेच त्यांचे पाकिस्तानमधील "लष्कर'च्या कमांडरशी सॅटफोन,

व्हीओआयपी

फोनवरून झालेले संभाषण, तसेच जीपीएस यामुळे पाकिस्तानचा सहभाग स्पष्ट होत आहे. या प्रकरणी तपास करणाऱ्या "एफबीआय'नेदेखील या हल्ल्यात पाकिस्तानच्या सहभागाचे पुरावे गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले आहेत. अतिरेकी महम्मद अजमल कसाब याच्यासोबत अटकेत असलेले फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन अहमद यांच्या चौकशीत त्यांना प्रशिक्षण देणाऱ्यांत कर्नल कियानी यांचे नाव पुढे आले.
अतिरेकी हल्ल्याच्या वेळीसुद्धा "लष्कर'चे कमांडर या अधिकाऱ्याच्या संपर्कात होते, असेही पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. वॉशिंग्टन येथे "एफबीआय'च्या मुख्यालयात गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना हे पुरावे उपलब्ध झाल्याचे समजते. अतिरेक्‍यांना लष्करी प्रशिक्षण देणाऱ्या कर्नल कियानी याने मुंबई हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला अतिरेकी सबाउद्दीन अहमद याला "आयएसआय'मध्ये दाखल होण्यास सांगितले होते. पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल अशफाक कियानी पाकिस्तानी गुप्तचर संघटना "आयएसआय'चे माजी प्रमुख आहेत. त्यामुळे मुंबई हल्ल्यातील अतिरेक्‍यांना माहिती असलेला कर्नल कियानी हा पाकिस्तानचा माजी लष्करप्रमुख तर नाही ना, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, असे गृह खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.


(sakal, 24 feb)

No comments: