Sunday, February 8, 2009

अतिरेकी हल्ल्यात पितृछत्र हरपलेल्या शीतलच्या शिक्षणासाठी चार लाख

मुंबईकरांचा गौरव ः आय लव्ह मुंबईचा मदतीचा हात

तीन महिन्यांच्या मुलीला बनारस येथे तिच्या आजी-आजोबांकडे पहिल्यांदाच घेऊन जाण्यासाठी उपेंद्र आणि सुनीता यादव हे दांपत्य 26 नोव्हेंबरच्या रात्री छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून जायला निघाले; मात्र अचानक झालेल्या अतिरेकी हल्ल्यात या लहानशा कुटुंबाच्या चेहऱ्यावरचे हास्य हरपले. अतिरेक्‍यांच्या हल्ल्यात उपेंद्र यांचे निधन झाल्याने त्यांची पत्नी सुनीता आणि अवघ्या तीन महिन्यांची मुलगी शीतल यांचा आधारच निखळला. "त्या' दोघींना सरकारकडून मदत तर मिळालीच, पण सामाजिक जाणिवेतून "आय लव्ह मुंबई' या संस्थेने लहानग्या शीतलच्या शिक्षणाकरिता मदत निधी गोळा करायला सुरुवात केली. समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला अन्‌ तिच्या शिक्षणासाठी तब्बल चार लाख 65 हजार रुपयांचा निधी गोळा झाला. या निधीचे वितरण काल (ता. 4) आय लव्ह मुंबईने घेतलेल्या एका विशेष कार्यक्रमात करण्यात आले. या कार्यक्रमात 26 नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्यातील शहीद पोलिस आणि नागरिक यांचे कुटुंबीय तसेच प्रसंगावधान दाखविणाऱ्या मुंबईकरांचा गौरवही करण्यात आला.

आझाद मैदान येथील पोलिस क्‍लबमध्ये आय लव्ह मुंबई, जायन्टस्‌ इंटरनॅशनल आणि बार्कलेज बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले मुंबई पोलिस दलातील सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय साळसकर, पोलिस निरीक्षक शशांक शिंदे, सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्यासह सर्व शहीद पोलिसांचे कुटुंबीय, प्रसंगावधान दाखवीत शेकडो लोकांचे जीव वाचविणारे सामान्य मुंबईकर यांचा गौरव करण्यात आला. यात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे अनेकांचे प्राण वाचविणारे मोहम्मद तौफिक शेख ऊर्फ छोटू चहावाला, कॅप्टन तमिलसेल्व्हम, रेल्वे कर्मचारी विष्णू झेंडे, सुरेश कुशवाह, विवेक शर्मा, यू. एम. पाटील, एस. डी. वाघ, जे. एस. झिंपरीकर, व्ही. वाघमारे, बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. पी. एल. तिवारी, जे. जे. रुग्णालयाचे डीन सबनीस यांनाही त्यांनी दाखविलेल्या तत्परतेबाबत सन्मानित करण्यात आले.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुंबई हल्ल्यातील जखमी अफरोज अन्सारी या लहान मुलाने केलेल्या मागणीनुसार त्याला संगणक पुरविण्यात आल्याची माहिती आय लव्ह मुंबईच्या विश्‍वस्त शायना एन. सी. यांनी उपस्थितांना सांगितले. या वेळी आय लव्ह मुंबईचे संस्थापक नाना चुडासामा, सहपोलिस आयुक्त भगवंत मोरे, बार्कलेज बॅंकेचे समीर भाटिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

(sakal,5 feb)

No comments: