Thursday, February 12, 2009

पाकिस्तानची कबुली हा भारताचा विजय

हसन गफूर ः 30 प्रश्‍नांची उत्तरेही मिळतील

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा कट आपल्याच जमिनीवर रचल्याची पाकिस्तानने दिलेली कबुली हा भारताचा विजय असून, त्यांनी विचारलेल्या 30 प्रश्‍नांना पोलिस लवकरच उत्तर देतील, अशी माहिती पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी रात्री उशिरा पत्रकारांशी बोलताना दिली. या
हल्ल्याप्रकरणी 16 आरोपींची यादी पाकिस्तानकडे सोपविण्यात आली असून, त्यात हल्ल्यात मरण पावलेले अतिरेकी आणि पाकिस्तानमध्ये असलेले त्यांचे
हस्तक, तसेच कमांडर अशा सहा जणांचा समावेश आहे. अतिरेक्‍यांना मदत केल्याप्रकरणी दोन भारतीयांना यापूर्वीच अटक करण्यात आल्याचेही गफूर या वेळी म्हणाले.
26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा तपास अंतिम टप्प्यात असून, येत्या 10 दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्यावर विदेशात गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याचा ताबा परदेशी तपास यंत्रणांना देण्याबाबतचा न्यायालयाचा निर्णय आहे. या हल्ल्याचा एफबीआय, स्कॉटलंड यार्ड, फ्रान्स, जर्मनी येथील तपास यंत्रणांनीही प्रत्यक्ष भारतात येऊन तपास केला. स्कॉटलंड यार्ड पोलिसांच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबने या प्रकरणी गोळा केलेले काही पुरावे आवश्‍यकता भासल्यास न्यायालयात सादर करू, असेही पोलिस आयुक्त या वेळी म्हणाले. मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेला अतिरेकी कसाब याच्या जीवाला धोका असल्याने त्याच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. या हल्ल्यात पोलिस आणि राष्ट्रीय सुरक्षा बल यांच्या कारवाईत ठार झालेल्या नऊ अतिरेक्‍यांचे मृतदेह पाकिस्तानने मागितल्यास ते देण्यात येतील; अन्यथा पोलिस त्यांची विल्हेवाट लावतील, असेही ते म्हणाले.

(sakal,13 feb)

------


"कसाब' साकारणाऱ्या अभिनेत्याला मारहाण

मुंबईवर 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर निघणाऱ्या "टोटल-10' या चित्रपटात मोहम्मद अजमल कसाबची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या राजन रामगोपाल वर्मा या अभिनेत्याला आज सकाळी अनोळखी व्यक्तीने मारहाण केल्याचा प्रकार मालाड येथे घडला. हल्लेखोराने वर्मा यांच्या गाडीवर दगडफेकही केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवर वासरी हिलजवळ रुस्तुमजी टॉवर येथे सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. दिग्दर्शक आनंद मांडरे आणि हरीओम शर्मा यांच्या या चित्रपटात राजन रामगोपाल वर्मा (29) हा अभिनेता "शहाब' ही अतिरेक्‍याची व्यक्तिरेखा साकारत आहे. मुंबई हल्ला प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मोहम्मद अजमल कसाबच्या व्यक्तिरेखेला "शहाब' असे नाव देण्यात आल्याचे सांगण्यात येते. ही भूमिका करणारे वर्मा सकाळी चित्रीकरणासाठी जात असताना एक अनोळखी व्यक्ती पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडे आली. यानंतर या व्यक्तीने "फिल्म का चक्कर बंद कर' असे धमकावत वर्मा यांना मारहाण केली; मात्र पुढच्याच क्षणी वर्मा आपल्या गाडीतून तेथून निसटले. त्यांच्या गाडीच्या मागे लागलेल्या या हल्लेखोराने गाडीवर दगडफेकही केली. वर्मा यांनी या प्रकाराची माहिती मालाड पोलिसांना दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


(sakal,13 feb)

No comments: