Sunday, February 8, 2009

रशियन एअरलाईन्स कर्मचाऱ्याची "ओबेरॉय'मध्ये आत्महत्या

"एअरलाईन एरोफ्लोट' या रशियन एअरलाईन्सच्या एका कर्मचाऱ्याने हॉटेल ओबेरॉयच्या सोळाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री उशिरा घडली. या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

अलेक्‍झांडर हेन्रीआनो ( 22) असे या आत्महत्या केलेल्या रशियन तरुणाचे नाव आहे. एअरलाईन एरोफ्लोटच्या विमानाने मुंबईत आलेला अलेक्‍झांडर काल रात्री त्याच्या चार सहकाऱ्यांसोबत हॉटेल ओबेरॉयमध्ये थांबला होता. रात्री उशिरापर्यंत सहकाऱ्यांसोबत मद्यपान केलेल्या अलेक्‍झांडरच्या मोबाईलवर एक वाजण्याच्या सुमारास फोन आला. फोनवर बराच वेळ बोलल्यानंतर आलेल्या मानसिक तणावामुळे तो खोलीबाहेर निघून गेला. यानंतर त्याने रागाच्या भरातच हॉटेल ओबेरॉयच्या सोळाव्या मजल्यावरील खिडकीतून स्वतःला खाली झोकून दिले. त्यात तो जागीच ठार झाला, असा जबाब त्याच्या मित्रांनी पोलिसांना दिला आहे.

पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता जे. जे. रुग्णालयात नेला असून या घटनेची रशियन दूतावासामार्फत त्याच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. या प्रकरणाची मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे
-------------


थरारक पाठलागानंतर चोरट्यांना अटक
चेन खेचून पळून जाणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी उभ्या असलेल्या पोलिसांनाच धडक देऊन पळणाऱ्या दोन मोटरसायकलवरील चौघांना माहीम पोलिसांनी थरारक पाठलाग करून अटक केल्याची घटना आज पहाटे घडली. या वेळी मोटरसायकलस्वाराच्या धडकेने एक पोलिस जखमी झाला असून, त्याला वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचार करून पाठविल्याची माहिती माहीम पोलिसांनी दिली.
मोटरसायकलवरून आलेल्या दोन चेनस्नॅचरनी शिवाजी पार्क येथील पादचाऱ्याचे सोन्याचे दागिने पळवून ते माहीमच्या दिशेने पळत असल्याची माहिती पोलिसांच्या गस्ती वाहनाने माहीम पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिस माहिम जंक्‍शनजवळ पॅडल रोड येथे उभे राहिले. तोपर्यंत मोटरसायकलवरून भरधाव आलेल्या चौघांना पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला; मात्र तेथे नाकाबंदीसाठी उभे असलेले पोलिस शिपाई जॉंबाज खान पठाण (32) यांना धडक देऊन या चोरट्यांनी धूम ठोकली; त्यात पठाण गंभीर जखमी झाले.
पठाण यांना जखमी करून पुढे निघालेल्या या चौघांचा माहीम पीटर-वनच्या गाडीने थरारक पाठलाग केला. एका मोटरसायकलने रस्त्यावर लावण्यात आलेले अडथळेही उडविले. त्यानंतर कुमार वैद्य मार्गावर या चौघांना सहायक पोलिस निरीक्षक मोहन जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अटक केली. विजय परमार (19), महेश वाघेला (18), विवेक मोरे (18) व राजेश गोहिल (22) अशी या चार आरोपींची नावे आहेत. या चौघांनी शिवाजी पार्क परिसरात चेन स्नॅचिंग केली आहे का, याचाही पोलिस शोध घेत आहेत. सध्या त्यांच्यावर अपघाताचा, तसेच सरकारी कामात अडथळा अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती माहीम पोलिसांनी दिली. अटक केलेल्या चारही आरोपींची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी तपासून पाहिली जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

--------


"सिनेमॅक्‍स'च्या व्यवस्थापकाची गळा चिरून हत्या

अंधेरी येथील सिनेमॅक्‍स चित्रपटगृहाचे व्यवस्थापक मंदार जयराम पाटील (वय 33) यांची अनोळखी मारेकऱ्यांनी तीक्ष्ण हत्यारांनी गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. याबाबत वर्सोवा पोलिस ठाण्यात अनोळखी मोरकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
अंधेरी-पश्‍चिमेला वर्सोवा गावात असलेल्या सर्वोदय सोसायटीच्या मैदानात मंदार यांचा मृतदेह पोलिसांना सापडला. त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने खोलवर जखमा केल्या गेल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांचा मृतदेह विच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठविला आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती वर्सोवा पोलिसांनी दिली.


(sakal,3 feb)

No comments: