Saturday, February 21, 2009

इंडियन मुजाहिदीनच्या सदस्यांचा ताबा एटीएस घेणार

रेल्वे बॉम्बस्फोट : संभाव्य सहभागाची चौकशी करणार

मुंबईच्या उपनगरी रेल्वेत जुलै 2006 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत असलेल्या संभाव्य सहभागाची चौकशी करण्याकरिता इंडियन मुजाहिदीनच्या सदस्यांचा ताबा दहशतवादविरोधी पथक घेणार आहे. यासंबंधीचा अर्ज लवकरच मोक्का न्यायालयात दाखल करणार असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी यांनी दिली.
जयपूर, अहमदाबाद, सुरत, बंगळूर आणि दिल्लीसह देशभरात 2005 पासून झालेल्या बॉम्बस्फोट मालिकांत असलेल्या सहभागाप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंडियन मुजाहिदीनच्या एकवीस अतिरेक्‍यांना अटक केली. या प्रकरणाचे आरोपपत्र काल मोक्का न्यायालयात गुन्हे शाखेने दाखल केले. या अतिरेक्‍यांविरुद्ध खटला सुरू होत असतानाच त्यांचा जुलै- 2005 मध्ये झालेल्या उपनगरी गाड्यांतील बॉम्बस्फोट मालिकांशी संबंध आहे का, ही बाब दहशतवादविरोधी पथक तपासणार आहे. 187 निष्पापांचे बळी घेणाऱ्या रेल्वे बॉम्बस्फोट मालिकेसंबंधी इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक सदस्य सादिक शेख याच्यासह काही अतिरेक्‍यांचा ताबा दहशतवादविरोधी पथक न्यायालयाकडे मागणार आहे. यासाठी लवकरच एक अर्ज मोक्का न्यायालयाला सादर करण्यात येणार आहे. गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्राची प्रत आजच आपल्याकडे आली आहे. या अतिरेक्‍यांचा 2005 पासून देशात झालेल्या स्फोटांत काही ना काही सहभाग मिळाल्याचे गुन्हे शाखेच्या आरोपपत्रात म्हटले आहे. तसे पुरावे गुन्हे शाखेकडे उपलब्ध आहेत. लवकरच या आरोपपत्राचा अभ्यास करून कायदेशीर सल्ला घेतला जाईल . तसेच गुन्हे शाखेकडे असलेल्या पुराव्यांची तपासणी केली जाईल. त्यानंतरच इंडियन मुजाहिदीनच्या या अतिरेक्‍यांची चौकशी केली जाईल, असेही रघुवंशी यांनी या वेळी सांगितले.

इंडियन मुजाहिदीनमध्येही होता फिदायिन गट

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंडियन मुजाहिदीनच्या 21 अतिरेक्‍यांविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येत आहेत. इंडियन मुजाहिदीनमध्येही फिदायीन गट कार्यरत होता. हा गट देशात आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीत होता. त्यासाठी जुलै आणि ऑगस्टमध्ये शस्त्रसाठाही पाठविण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती दिल्लीच्या बाटला हाऊस येथे झालेल्या ऑपरेशनमध्ये अटक झालेला आरोपी मोहम्मद सैद याच्या चौकशीत स्पष्ट झाले असून त्याने दिलेल्या कबुलीचा उल्लेख या आरोपपत्रात असल्याचे गुन्हे शाखेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.


(sakal,19 feb)

No comments: