Sunday, February 8, 2009

सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय सरकारवर अवलंबून

चित्कला झुत्शी ः विर्क यांच्या नियुक्तीची दाट शक्‍यता

उच्च न्यायालयाने पोलिस महासंचालक अनामी राय यांनी नियुक्ती रद्द करण्याच्या दिलेल्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याबाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी असून लवकरच त्याबाबतचा निर्णय सरकार घेईल, अशी माहिती गृहखात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव चित्कला झुत्शी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सर्वोच्च न्यायालयात न जाण्याचा निर्णय झाल्यास सेवाज्येष्ठतेनुसार महासंचालकपदी एस. एस. विर्क यांची नियुक्ती होण्याची दाट शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राय यांची नियुक्ती रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास केल्यावर याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही झुत्शी यांनी या वेळी स्पष्ट केले. न्यायालयाच्या आजच्या आदेशाविरुद्ध राज्य सरकार किंवा स्वतः महासंचालक राय सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करू शकतात. याबाबत राय यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र अपील सादर झाल्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यास अथवा लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यास महासंचालकपदी नवीन नियुक्ती होण्याबाबत पोलिस वर्तुळात साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
फेब्रुवारी-2008 मध्ये राय यांना तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलून महासंचालक पदावर नेमण्यात आले. राज्य सरकार व राय या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात न जाण्याचा निर्णय घेतल्यास पोलिस महासंचालक पदाच्या नियुक्तीची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार सरकारला पुन्हा राबवावी लागेल. या पदासाठी एस. एस. विर्क, जीवन वीरकर आणि सुप्रकाश चक्रवर्ती या तिघा ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा विचार करावा लागणार आहे.

(sakal,5 feb)

No comments: