Sunday, February 8, 2009

प्रीतीच्या वाढदिवसाला शेजाऱ्यांचे "जागरण'

कर्णकर्कश संगीत : कायदा धाब्यावर बसविल्याचा आरोप


वाढदिवसाच्या "पर्वणी'वर पहाटे उशिरापर्यंत मोठ्या आवाजात "डीजे' वाजवून शेजाऱ्यांना त्रास दिल्याप्रकरणी बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटा हिला स्थानिक नागरिकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री दहानंतर मोठ्या आवाजात संगीत वाजविण्यास बंदी असताना प्रीतीने केलेल्या कायद्याच्या उल्लंघनाबाबत तिच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत असल्याचे वृत्त "यूएनआय'ने दिले आहे.

पाली हिल येथे वास्तव्य असलेल्या प्रीतीने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील घरात वाढदिवसानिमित्त एक पार्टी ठेवली होती. या पार्टीत "डीजे'च्या तालावर प्रीतीचे मित्र-मैत्रिणी बेधुंद होऊन नाचले. पहाटे चार वाजल्यापर्यंत मोठ्या आवाजात वाजविण्यात येणाऱ्या या "म्युझिक'मुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या झोपेचे मात्र खोबरे झाल्याची तक्रार आहे. पहाटे उशिरापर्यंत चांगलेच जागरण झालेल्या नागरिकांनी या प्रकरणाची माहिती खार पोलिसांना दिली. त्यापूर्वी काही नागरिकांना ही बाब पोलिस नियंत्रण कक्षालाही कळविली होती.

पोलिसांची डोळेझाक?
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन होत असल्याने पोलिस या ठिकाणी आले; मात्र त्यांनी कोणतीही कारवाई न करता तेथून काढता पाय घेतला, असा आरोप आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने प्रीतीने पहाटे उशिरापर्यंत हा गोंधळ घातला असला तरी स्थानिक पोलिसांनी याबाबत आपल्याला काहीच माहीत नसल्याचे सांगितले. नागरिकांच्या तक्रारीनंतरही या घटनेची खार पोलिस ठाण्यात नोंदच नसल्याचे समजते.
(sakal,2 feb)

No comments: