Wednesday, February 11, 2009

अपहृत मुलाची फिल्मी स्टाईलने सुटका

खंडणीसाठी अपहरण ः रेल्वेच्या आवाजावरून माग; अपहरणकर्त्यांना बेड्या

बॉलीवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन याचा "आखरी रस्ता' चित्रपट आठवतोय? गुन्हेगार वडिलांचा शोध घेण्यासाठी जंग जंग पछाडणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला खिजविण्याकरिता वडिलांचा दूरध्वनी येतो. त्यांच्याशी बोलताना मागून जाणाऱ्या रेल्वेच्या शिटीचा आवाज हा चाणाक्ष अधिकारी हेरतो. अन्‌ वडिलांच्या शोधार्थ पोलिसांना रेल्वेस्थानक आणि रेल्वे रुळांच्या परिसरात शोध घ्यायला सांगतो. अगदी असाच प्रसंग नुकताच ऍण्टॉप हिल पोलिसांच्या बाबतीत नुकताच घडला. एका व्यापाऱ्याच्या सहा वर्षांच्या मुलाला 30 लाख रुपयांच्या खंडणीसाठी उचलून नेण्यात आले. अपहरणकर्त्यांशी दूरध्वनीवरून बोलणाऱ्या व्यापाऱ्याचा फोन टॅप करीत असताना मागून जाणाऱ्या रेल्वेच्या भोंग्याचा आवाज पोलिसांच्या तिखट कानांनी ऐकला. लगेचच अपहृत मुलाच्या शोधासाठी रेल्वेस्थानक व रेल्वे रुळांलगतच्या भागात पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू झाले. पोलिसांनी दोन दिवस केलेल्या परिश्रमानंतर शेवटी हा भाग मुंब्रा गाव येथे असल्याचे स्पष्ट झाले आणि या गावातील एका मंदिराजवळून अपहरण झालेल्या "त्या' चिमुरड्याची सुखरूप मुक्तता झाली. पोलिस मागावर असल्याचे पाहून रविवारी रात्री पळून जाण्यात यशस्वी ठरलेले ते दोघे अपहरणकर्ते काल रात्री उशिरा पोलिसांच्या तावडीत सापडले. हिंदी चित्रपटाला साजेशा या घटनेनंतर पोलिसांनी या दोघांच्या मुसक्‍या आवळल्याची माहिती परिमंडळ-4 चे पोलिस उपायुक्त एस. डी. बाविस्कर यांनी "सकाळ'ला दिली. आरोपींपैकी एक जण "त्या' व्यापाऱ्याचाच जुना नोकर असल्याचेही त्यांनी सांगितले.
शीव-कोळीवाडा येथील बीएमसी क्वॉर्टर्ससमोरून शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास प्रल्हाद गुप्ता या लहानग्याचे सोनू सिंग (वय 23; रा. दिवा) व सचिन सोनवणे (22, रा. डोंबिवली) दोघांनी अपहरण केले. सोन्याचे व्यापारी असलेले प्रल्हादचे वडील ओमप्रकाश गुप्ता यांना 30 लाखांच्या खंडणीसाठी दूरध्वनी यायला सुरुवात झाली. या प्रकाराने भेदरलेल्या ओमप्रकाश गुप्ता यांनी तत्काळ ऍन्टॉप हिल पोलिस ठाण्यात ही माहिती दिली. अतिशय संवेदनशील असलेल्या या घटनेच्या तपासासाठी परिमंडळ-5 चे पोलिस उपायुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. गुप्ता यांना वारंवार दूरध्वनी करून अपहरणकर्ते ठाणे, कुर्ला, वांद्रे, मुलुंड अशा सहा वेगवेगळ्या ठिकाणी बोलावत होते; मात्र मुंब्रा येथून अपहरणकर्त्यांनी केलेला दूरध्वनी पोलिसांच्या पथ्यावर पडला. रेल्वेस्थानक व रेल्वे रुळांच्या परिसरात शोधमोहीम हाती घेतल्यानंतर अपहरणकर्ते मुंब्रा परिसरात असल्याचे पोलिसांना कळले. पोलिसांनी या परिसरात आधीच सापळा लावला होता. पोलिसांच्या निर्देशानुसार गुप्ता यांनी अपहरणकर्त्यांनी मागणी केलेली खंडणीची रक्कम मुंब्रा येथील मंदिराजवळ नेऊन ठेवली. अपहृत मुलगा व पैशांची बॅग यांच्यात अंतरही बरेच ठेवण्यात आले. बॅग घेण्याच्या प्रयत्नात अपहरणकर्ते मंदिराजवळ गेले; मात्र तोपर्यंत या बेवारस बॅगेभोवती बघ्यांची गर्दी झाली. अशातच पोलिस मागावरच असल्याचे लक्षात येताच दोन अपहरणकर्त्यांनी तेथून पळ काढला. रात्री साडेनऊ वाजता पोलिसांनी प्रल्हाद याची सुखरूप मुक्तता केली. त्यानंतर काल रात्री दिवा व डोंबिवली परिसरात घेतलेल्या शोधमोहिमेत पोलिसांनी दोघांना अटक केली. सोनू सिंग हा ओमप्रकाश गुप्ता यांच्याकडे वर्षभरापूर्वी कामाला होता. झटपट पैसे कमविण्यासाठी दोघांनी हा प्रकार केल्याची माहिती पोलिस उपायुक्त बाविस्कर यांनी दिली.

(sakal,12 feb)

No comments: