Wednesday, February 11, 2009

वांद्य्रात 250 झोपड्या भस्मसात

18 जखमी ः हृदयविकाराने एकाचा मृत्यू

वांद्रे पश्‍चिमेला असलेल्या ओल्ड स्लॉटर हाऊस कंपाउंड येथील महाराष्ट्र नगर क्रमांक -1 या झोपडपट्टीला आज दुपारी लागलेल्या भीषण आगीत सुमारे 700 झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीमुळे एका नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला; तर 18 जण जखमी झाले. आगीमुळे बेघर झालेल्या झोपडीवासीयांना जवळच असलेल्या शाळा आणि मैदानात तात्पुरता आश्रय देण्यात आला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचे काम करीत होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

वांद्रे रेल्वेस्थानकालगत महापालिकेच्या यानगृहाजवळ ही झोपडपट्टी आहे. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास झोपडपट्टीला आग लागली. झोपड्या बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाकडांचा वापर केला गेल्याने आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे समजताच शेकडो रहिवाशांनी मुलांना घेऊन जीवाच्या आकांताने घराबाहेर धाव घेतली. त्यातच झोपड्यांत असलेल्या गॅस सिलिंडरचे एकामागोमाग एक असे पाच स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. या स्फोटानंतर लगेचच आगीचे मोठे लोळ आकाशात झेपावताना दिसले. या सगळ्या धावपळ आणि गोंधळात अनेकांना किरकोळ जखमा झाल्या.

आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नाची शिकस्त करीत होते. काही नागरिकही त्यांना आग विझविण्यासाठी मदत करीत होते; मात्र मोठ्या प्रमाणावर पसरलेला धूर आणि अरुंद रस्त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यात अडचणी येत होत्या. मोठ्या कष्टाने गोळा केलेल्या संसारोपयोगी वस्तू आगीत भस्मसात होत असताना अनेकांचा जीव तुटत होता. तसेच आगीला आटोक्‍यात आणण्यात अग्निशमन दलाला अपेक्षित यश येत नसल्याने नागरिकांत असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे तरुणांचा एक गट या घटनेचे छायाचित्रण करण्यापासून प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींना विरोध करीत होता.
आगीमुळे या परिसरात राहणारा रेहान शेख (40) या नागरिकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने मृत्यू झाला. ही आग विझविताना तब्बल अठरा जण जखमी झाले. त्यात लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती वांद्रे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश जॉर्ज यांनी दिली.

महाराष्ट्रनगर झोपडपट्टीत आग लागल्याचे कळताच शेजारीच असलेल्या शास्त्रीनगर तसेच रेल्वेस्थानक परिसरात बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. या जमावाला आवर घालण्यासाठी या संपूर्ण परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. आगीत भस्मसात झालेल्या झोपड्यांमुळे बेघर झालेल्या शेकडो महिला आणि लहान मुलांना जवळच असलेल्या आवामी हायस्कूल, वांद्रे हायस्कूल आणि वांद्रे येथील मैदानात तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम मोहम्मद यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. या झोपडपट्टीत झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविण्यात येत आहे. मात्र इमारत उभी राहायला बराच कालावधी लागणार असल्याने रहिवाशांना उघड्यावरच राहावे लागणार असल्याचे तेथील रहिवासी मोहम्मद आझाद खान यांनी सांगितले.

(sakal,10 feb)

No comments: