Saturday, February 21, 2009

कसाब, पाकिस्तानविरुद्ध एफबीआयकडून सबळ पुरावे

देवेन भारती ः पुरावे आरोपपत्रात समाविष्ट करणार

मुंबई हल्ल्याच्या तपासाकरिता एफबीआयची मदत घेण्यासाठी गेलेले गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पथक आज पहाटे मुंबईत परतले. अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब आणि पाकिस्तानविरुद्ध सबळ पुरावे एफबीआयकडून मिळाले असून हे पुरावे आरोपपत्रात समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी दिली.
26 नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्याचा कट पाकिस्तानात रचल्याचे पुरावे हल्ल्याच्या वेळी पाकिस्तानमध्ये असलेल्या लष्कर ए तैयबाच्या कमांडरसोबत अतिरेक्‍यांनी केलेल्या संभाषणाने सिद्ध होणार आहे. अतिरेक्‍यांनी वॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (वॉईप) फोन आणि सॅटेलाईट फोनद्वारे केलेले मिनिटागणिक संभाषण एफबीआयने गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले आहे. हल्ल्यानंतर 1 डिसेंबरपासून एफबीआयचे पथक मुंबईत हल्ल्यासंबंधी स्वतंत्र तपास करीत होते. एफबीआयच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबकडे असणारे पुरावेही तेथील अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना दिले. अतिरेकी मोहम्मद कसाबविरुद्धही हेच पुरावे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या तीन सदस्यीय पथकाने वॉशिंग्टन येथील एफबीआय मुख्यालयात तेथील अधिकाऱ्यांची भेट घेऊन माहिती तसेच पुराव्यांची देवाणघेवाण केली. हे सर्व आरोपपत्रात समाविष्ट करून अजमल कसाबविरुद्ध न्यायालयात सादर केले जातील, असेही भारती या वेळी म्हणाले. अतिरेक्‍यांनी वापरलेल्या गोळ्यांचा एफबीआयच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबकडून अहवाल येण्यासाठी काही काळ लागणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.


----------


न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर कसाबचा कबुलीजबाब

मुंबई हल्ल्यातील अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याचा कबुलीजबाब न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदविण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. त्याकरिता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी पत्रकारांशी बोलताना येथे दिली. या कबुलीजबाबानंतर कसाबची पुन्हा नव्याने ओळख परेड होणार असल्याचेही मारिया यांनी सांगितले.
अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याला पोलिस कोठडीतून 26 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे. या कोठडीत त्याच्याकडून न्याय दंडाधिकारी कलम 164 अन्वये कबुली जबाब नोंदवून घेतील. हल्ल्यात असलेला कसाबचा सहभाग सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर त्याची ओळख परेड घेण्यात येणार आहे. त्याच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता, न्यायालयीन कोठडी ठोठावल्यानंतर त्याला गुप्त ठिकाणी ठेवण्यात आले आहे. कसाबची रवानगी आर्थर रोड कारागृहात झाल्याबाबत विचारणा केली असता, मारिया यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

(sakal,20 feb)

No comments: