आगळी योजना ः वाहतुकीचा संदेश देणार
"आमचे रक्षण कसे करायचे ते आम्ही तुम्हाला दाखवू' हा सुरक्षित वाहने चालविण्यासंबंधीचा संदेश आपले आई-वडील आणि पर्यायाने मुंबईकरांना देण्याकरिता वीस शाळांमधील शंभर विद्यार्थी येत्या काळात "पोलिस ऍम्बेसिडर' म्हणून काम करणार आहेत. ही आगळी योजना राबविली आहे शहर वाहतूक पोलिस आणि चिल्ड्रन मूव्हमेंट फॉर सिव्हिक अवेअरनेस (सीएमसीए) या स्वयंसेवी संस्थेने.
शहरातील वाहतूक व्यवस्थेला योग्य शिस्त लागण्याकरिता शहर वाहतूक पोलिसांकडून आजवर विविध प्रयत्न करण्यात आले. मद्यपी वाहनचालक, हेल्मेटसक्ती आणि वाहने चालविताना मोबाईल फोनचा वापर टाळण्यासारख्या घेतलेल्या मोहिमांमुळे रस्ते अपघातांच्या घटनांत कपात झाली आहे. विद्यार्थी उद्याचे नागरिक असल्याने शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना "पोलिस ऍम्बेसिडर' बनवून त्यांना रस्ता सुरक्षेसंबंधीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुलांनी त्यांच्या वडिलांना रस्ता सुरक्षिततेचे धडे देणे हा तसा कुतूहलाचा विषय ठरणार आहे. मुलांनी त्यांच्या वडिलांचे सीटबेल्ट लावणे, हेल्मेट घालणे, अनावश्यक ठिकाणी हॉर्न न वाजविणे अशा लहान-लहान बाबींत प्रबोधन केल्यास पोलिसांचे काम हलके होणार असल्याचे मत वाहतूक शाखेचे सह पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी या उपक्रमाची माहिती देताना व्यक्त केले. वरळी येथील वाहतूक पोलिस मुख्यालयात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी वाहतूक पोलिस उपायुक्त हरीश बैजल, सहायक पोलिस आयुक्त अमरजित सिंग आणि सीएमसीएच्या समन्वयक विनोदिनी लुल्ला यांच्यासोबत शाळांतील विद्यार्थी उपस्थित होते.
(sakal,15 feb)
No comments:
Post a Comment