"बिल्लू'चा वाद ः गॅलॅक्सी-गेईटी चित्रपटगृहातही तोडफोड
बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान याच्या वांद्रे येथील "मन्नत' बंगल्यावर मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखी हल्लेखोरांनी केरोसिनने भरलेल्या बाटल्या फेकल्याची घटना आज पहाटे घडली. सुदैवाने या हल्ल्यात कोणालाही इजा झालेली नाही. या वेळी शाहरूख घरात नसल्याची माहिती परिमंडळ -9 चे पोलिस उपायुक्त निकेत कौशिक यांनी दिली. दरम्यान, आज प्रदर्शित झालेल्या "बिल्लू' चित्रपटातील गाण्यावरून मुस्लिम समाजात निर्माण झालेल्या गैरसमजामुळे काही तरुणांनी वांद्रे येथील गॅलॅक्सी-गेईटी चित्रपटगृहावर हल्ला करून तेथे तोडफोड केल्याचा प्रकार आज दुपारी घडला.
अभिनेता शाहरूख खान याचा आज प्रदर्शित झालेला "बिल्लू' हा चित्रपट त्याच्या शीर्षकामुळे सुरुवातीपासूनच वादात आहे. नाभिक समाजाच्या भावना दुखावत असल्याने या चित्रपटाचे "बिल्लू बार्बर' हे नाव बदलून ते "बिल्लू' असे ठेवण्यात आले. असे असतानाही आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अनोळखी हल्लेखोरांनी शाहरूखच्या "मन्नत' बंगल्यावर केरोसिनने भरलेल्या बाटल्या भिरकावल्या. या वेळी बंगल्याच्या बाहेर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोरांचा पाठलागही केला; मात्र हल्लेखोर पळून गेले. याप्रकरणी अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त निकेत कौशिक यांनी सांगितले. एका चित्रपटाच्या शूटिंगकरिता शाहरूख खान परदेशात असल्याचेही कौशिक म्हणाले.
घरावर झालेल्या हल्ल्यानंतरही शाहरूखवर आलेले जनतेच्या नाराजीचे बालंट टळले नाही. त्याची प्रमुख भूमिका असलेल्या "बिल्लू' चित्रपटातील "मर जानी मर जानी' या गाण्यातून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावत असल्याचा समज झालेल्या तरुणांच्या एका गटाने दुपारी पावणेएक वाजण्याच्या सुमारास वांद्रे येथील गेईटी-गॅलॅक्सी चित्रपटगृहावर शीतपेयाच्या बाटल्या व दगड फेकले. या वेळी काहींनी चित्रपटविरोधी घोषणाही दिल्या. कारवाई करण्यापूर्वीच हल्लेखोर तरुण पळून गेले. यानंतर दुपारी मुस्लिम समाजातील काही नागरिक चित्रपटातील गाण्यावर आक्षेप घेत पुन्हा चित्रपटगृहाबाहेर मोठ्या संख्येने गोळा झाले. मात्र त्यांची समज काढून त्यांना परत पाठविण्यात आल्याची माहिती उपायुक्त कौशिक यांनी दिली. चित्रपटगृहाबाहेर केलेल्या तोडफोडप्रकरणी अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे कौशिक म्हणाले.
(sakal,13 feb)
No comments:
Post a Comment