Sunday, February 8, 2009

अतिरेकी हल्ल्याप्रसंगी कसूर करणाऱ्या पोलिसांवर कारवाई ?

शिशुपाल यांची बदली ः पोलिसांकडून प्रशासकीय बाब असल्याचे स्पष्ट

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्यावेळी प्राणपणाने लढून हौतात्म्य पत्करणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांचा सर्वत्र सन्मान होत असतानाच कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर आता कारवाईला सुरवात झाली आहे. याच कारवाईचा एक भाग म्हणून की काय आझादमैदान पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश शिशुपाल यांची स्थानिक शस्त्र (एलए) विभागात बदली करण्यात आली. हल्ल्याच्या वेळी दाखविलेल्या हलगर्जीपणामुळे त्यांची बदली झाल्याचे बोलले जाते. मात्र, या बदलीमागे 26 नोव्हेंबरचा हल्ला हे कारण नाही. प्रशासकीय कामकाजाचा एक भाग म्हणून ही बदली करण्यात आल्याची माहिती प्रशासन विभागाचे सह पोलिस आयुक्त भगवंत मोरे यांनी दिली.

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या रात्री अतिरेक्‍यांनी आझादमैदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर घातपात घडविला. अशा आणीबाणीप्रसंगी आझाद मैदान पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश शिशुपाल मात्र कर्तव्यावर उपस्थित नव्हते. हल्ल्याच्या वेळी कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीची चौकशी करण्याची मागणी "सकाळ'ने यापूर्वी एक शून्य शून्य सदरातून "नेभळटपणाची चौकशी व्हावी' या मथळ्याखाली केली होती. केवळ दुर्दैव म्हणून 26 नोव्हेंबरच्या हल्ल्याची घटना समजण्यासाठी फार उशीर लागल्याची खंत शिशुपाल यांनी "सकाळ' कडे व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी सकाळी अमरावती दौऱ्यावर जाणार असल्याने 26 नोव्हेंबरच्या रात्री 8.40 वाजल्यापासून आपण रजेवर गेलो. सकाळी लवकर निघायचे असल्याने त्या रात्री आपण लवकर झोपलो. त्या रात्री आपला मोबाईल फोन देखील दुसऱ्या खोलीत राहिल्याने पहाटेपर्यंत बाहेर घडत असलेला प्रकार लक्षातच आला नाही. पहाटे पावणेतीनच्या सुमारास या घटनेची माहिती मिळताच आपण पोलिस ठाण्यात पोचलो. तेव्हापासून या प्रकरणाच्या तपास प्रक्रियेत आपण होतो असेही ते म्हणाले.
प्रशासकीय कामकाजातील उणिवांमुळे आपल्याला तीन महिन्यांपूर्वीच एक नोटीस बजावण्यात आली होती. त्या नोटिशीच्या अनुषंगाने 2 फेब्रुवारीपासून आपली बदली झाली. 26 नोव्हेंबरच्या हल्ल्याचा आणि बदलीचा दुरान्वयेही संबंध नाही असे शिशुपाल यांचे म्हणणे आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणाला प्रशासन विभागाचे सहपोलिस आयुक्त भगवंत मोरे यांनी दुजोरा दिला. स्थानिक शस्त्र (एलए) शाखेशी संलग्न झालेले शिशुपाल आजारपणाच्या रजेवर गेले आहेत.

(sakal,5 feb)

--------------



अमेरिकी तरुणीचा जुहू येथे विनयभंग


देश-विदेशातील कृष्णभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या जुहू येथील इस्कॉन मंदिराच्या निवासी संकुलात राहणाऱ्या अमेरिकन तरुणीचा अनोळखी व्यक्तीने विनयभंग केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. धार्मिक स्थळी झालेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून याबाबत अनोळखी व्यक्तीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक काथकाडे यांनी दिली.
महिनाभरापूर्वी भारतात आलेल्या या अमेरिकन युवतीने इस्कॉनच्या निवासी संकुलात राहत असताना रविवारी सकाळी जुहू पोलिस ठाण्यात विनयभंग झाल्याची तक्रार दिली. या वेळी बलात्काराची शक्‍यताही व्यक्त झाल्याने पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेतला. मात्र तिने वैद्यकीय तपासणी करायला नकार दिला. या प्रकरणी मंदिर व्यवस्थापनदेखील त्यांच्या पातळीवर चौकशी करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक काथकाडे यांनी दिली. ही तरुणी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या तिच्या मित्र-मंडळींना भेटायला आली होती, असेही ते म्हणाले.

(sakal,4 feb)

No comments: