Wednesday, April 15, 2009

बलात्कारप्रकरणी तिघा विद्यार्थ्यांना पोलिस कोठडी

परदेशी विद्यार्थिनीचे प्रकरण : पोलिसांवर असहकार्याचा आरोप

"टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस'मध्ये शिकणाऱ्या अमेरिकन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तिघा विद्यार्थ्यांना येत्या 28 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कुर्ला न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, पोलिसांनी सहकार्य न केल्याने पहिल्या दिवशी आपल्याला याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविता आली नाही, असा आरोप या विद्यार्थिनीने केल्याचे समजते. ट्रॉम्बे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.

"टाटा इन्स्टिट्यूट'मध्ये शिकणाऱ्या या तेवीस वर्षीय विद्यार्थिनीवर 11 एप्रिलला तिच्या ओळखीच्याच सहा विद्यार्थ्यांनी अंधेरी येथील एका घरात बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार काल उघडकीस आला. बलात्काराच्या या घटनेनंतर संस्थेतील हॉस्टेलमध्ये गेलेल्या या विद्यार्थिनीने तिच्या शिक्षकांना घडलेला सगळा प्रकार सांगितल्यानंतर तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. तिची तपासणी करणाऱ्या डॉक्‍टरांनी या प्रकाराची माहिती त्या वेळी रुग्णालयात असलेल्या पोलिसांना देण्यास सांगितले. त्याप्रमाणे या विद्यार्थिनीने तेथील पोलिसांना घडलेला प्रकार सांगितलाही; मात्र बराच वेळ थांबल्यानंतरही पोलिसांनी या प्रकरणी आपल्याला काहीच मदत केली नाही, असा पीडित विद्यर्थिनीचा आरोप आहे. यानंतर मात्र आई आणि काही मित्रांशी बोलल्यानंतर धीर आल्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे या विद्यार्थिनीने म्हटल्याचे समजते. ट्रॉम्बे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एन. आर.अम्बूपे यांनी हा आरोप फेटाळून लावत, तसा कोणताही प्रकार झाला नसल्याचा दावा केला. टाटा इन्स्टिट्यूटमधील शिक्षकांनी दिलेल्या आधारानंतर या विद्यार्थिनीने मंगळवारी मध्यरात्री ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचे अम्बूपे यांनी सांगितले. अमेरिकेतील इदाहो येथून गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात "जेण्डर ऍण्ड डेव्हलपमेंट' या विषयाच्या अभ्यासासाठी ही विद्यार्थिनी आली होती.

दरम्यान, या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी विनम्र सोनी, करन सिंग, हर्ष, अनिश, देवशी आणि कुंदन या मित्रांपैकी अटक केलेल्या तिघा जणांना कुर्ला न्यायालयाने 28 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अन्य तिघांच्या शोधार्थ परराज्यात पोलिस पथके पाठविण्यात आली आहेत. आतापर्यंत बलात्कारित विद्यार्थिनीचे नातेवाईक; तसेच आरोपी विद्यार्थ्यांचे निकटवर्तीय अशा कोणीच पोलिसांशी संपर्क साधला नसल्याची माहिती अम्बूपे यांनी दिली.


(sakal,17 april)

No comments: