Tuesday, April 7, 2009

मलबारीला मुंबईत आणणार

तीन गुन्ह्यांप्रकरणी दोषी

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवर बॅंकॉकमध्ये हल्ला करणाऱ्या रशीद मलबारीला दिल्ली व कर्नाटक पोलिसांनी संयुक्त कारवाईत मंगळूर येथून अटक केल्यानंतर खुनाच्या तीन गुन्ह्यांच्या प्रकरणात त्याला पुढील आठवड्यात मुंबईत आणण्यात येणार आहे. गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज ही माहिती दिली.
छोटा शकील टोळीचा शार्प शूटर असलेल्या रशीद मलबारीला रविवारी मंगळूर येथून अटक करण्यात आली. मलबारीवर मुंबईत शिवाजीनगर, टिळकनगर आणि वांद्रे येथे खुनाचे तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. 1997 मध्ये शिवाजीनगर येथे छोटा राजन टोळीचा गुंड कृष्णा राऊळ; तसेच टिळकनगर येथे शब्बीर खान मुरादखान पठाण या दोघांची गोळीबार करून रशीदने हत्या केली होती. याशिवाय 1998 मध्ये वांद्रे येथील हिल रोड परिसरात अल्ताफ फर्निचरवाला याची खंडणीच्या प्रकरणातून हत्या केली होती. या तिन्ही प्रकरणांनंतर रशीद मुंबईबाहेर गेला होता. 2000 मध्ये त्याने बॅंकॉकमध्ये छोटा राजनवर प्राणघातक हल्ला केला होता. याशिवाय बाळू ढोकरे याच्यावरही त्यानेच परदेशात हल्ला केला होता. रशीदचा मोठा भाऊ इस्माईल मलबारी याच्या विक्रोळी न्यायालयाबाहेर छोटा राजन टोळीच्या गुंडांनी केलेल्या हत्येनंतर रशीद मलबारीचे नाव गुन्हेगारी जगतात पुढे आले होते. काही वर्षे नेपाळमध्ये वास्तव्य केल्यानंतर तो भारतात आला होता. तो मंगळूरमध्ये लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याला मुंबईत दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी येथे आणले जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली.
(sakal,2 april)

No comments: