Tuesday, April 7, 2009

रेल्वे प्रवासात चोरलेल्या 20 लाखांच्या वस्तू परत

पोलिसांची कारवाई ः 117 तक्रारदारांना सुखद धक्का

महिनाभरापूर्वी रेल्वे प्रवासात भांडुपला राहणाऱ्या स्वाती पाठारे यांच्या पर्समधून साडेदहा हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. पवईला आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी कुर्ला पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिली; पण चोरी झालेली रोख परत मिळण्याची अपेक्षा त्यांना नव्हती. फेब्रुवारी महिन्यात कुर्ला रेल्वे पोलिसांकडून त्यांच्या मोबाईलवर फोन आला. "मॅडम, तुमचे चोरीला गेलेले पाकीट परत मिळाले आहे; मात्र त्यात फक्त सात हजार रुपयेच सापडलेत. उरलेली रक्कम चोरट्या महिलेने संपविली आहे.' महिनाभरापूर्वी चोरीला गेलेले पाकीट पुन्हा सापडल्याने पाठारे यांना आनंद झाला होता. रेल्वे पोलिसांनी आज घेतलेल्या एका विशेष कार्यक्रमात पाठारे यांच्यासारख्या तब्बल 117 तक्रारदारांच्या सुमारे 20 लाख रुपये किमतीच्या चोरीला गेलेल्या मौल्यवान वस्तू समारंभपूर्वक परत करण्यात आल्या. चोरीला गेलेले सोन्याचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल फोन अशा कित्येक मौल्यवान वस्तू परत मिळाल्यानंतर या प्रवाशांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता.
मुंबईच्या उपनगरी लोकलमधून दिवसाला प्रवास करणाऱ्या 60 लाखांहून अधिक प्रवाशांना दैनंदिन प्रवासात त्यांच्या वस्तू चोरीला जाण्याचे प्रकार नवीन नाहीत. रेल्वे स्थानकांतच असलेल्या पोलिस ठाण्यांत अथवा चौकीत चोरीला गेलेल्या या वस्तूंची माहिती द्यायची आणि त्या परत मिळण्याची अपेक्षा सोडून द्यायची, असा आजवरचा अनुभव; मात्र रेल्वे पोलिसांनी एका विशेष मोहिमेत प्रवाशांना त्यांच्या चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे आज झालेल्या एका कार्यक्रमात प्रवाशांच्या वस्तूंचे वितरण करण्यात आले. रेल्वेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी, रेल्वे पोलिस आयुक्त अशोक शर्मा, उपायुक्त वसंत कोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. आज वितरित करण्यात आलेल्या ऐवजाच्या वीसपट ऐवज रेल्वे पोलिसांकडे असून त्यांचे वितरणही कायदेशीर बाबींची पूर्तता करून लवकरच करण्यात येणार असल्याचे रेल्वे पोलिस आयुक्त अशोक शर्मा यांनी सांगितले. महिला प्रवाशांना होणाऱ्या छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी त्यांच्याकरिता स्वतंत्र तक्रारपेटी रेल्वे स्थानकांवर लावण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

(sakal,7 april)

No comments: