Tuesday, April 7, 2009

छोटा राजनवर हल्ला करणाऱ्या मलबारी याला अटक

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्यावर बॅंकॉकमध्ये हल्ला करणारा आरोपी रशीद मलबारी याला दिल्ली आणि कर्नाटक पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत बंगळूर येथे अटक करण्यात आली. मलबारी याला चौकशीसाठी लवकरच मुंबईला नेण्यात येणार असल्याची माहिती गुप्तचर खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मध्य बॅंकॉकमधून आपल्या टोळीची सूत्रे हलविणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवर सप्टेंबर 2000 मध्ये छोटा शकीलच्या गुंडानी प्राणघातक हल्ला केला होता. यावेळी राजनचा विश्‍वासू साथीदार रोहित वर्मा मारला गेला होता. पोलिस तपासाअंती हा हल्ला इब्राहिम मलबारी आणि त्याचा लहान भाऊ रशीद मलबारी या दोघांनी केल्याचे स्पष्ट झाले होते. या हल्ल्यानंतर इब्राहिम मलबारी पोलिस चकमकीत मारला गेला होता. तर त्याचा लहान भाऊ रशीद मलबारी गेली अनेक वर्षे फरार होता. रशीद बंगळूर येथे लपल्याची माहिती आयबी या केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला आज प्राप्त झाली. त्यानुसार आयबीच्या दिल्ली येथील पथकाने कर्नाटक पोलिसांच्या मदतीने रशीद याला अटक केली. छोटा शकील टोळीचा शूटर समजला जाणाऱ्या रशिदवर मुंबईतही गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांच्या चौकशीसाठी त्याला लवकरच मुंबईला नेण्यात येणार असल्याचे केंद्रीय गुप्तचर खात्यातील अधिकाऱ्याने "सकाळ' ला दिली.

(sakal,30 march)

No comments: