Wednesday, April 15, 2009

चुकून गोळी सुटल्याने पोलिस ठाण्यात शिवसैनिक जखमी

अंबोली : शस्त्र जमा करतानाची घटना

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अंबोली पोलिस ठाण्यात परवानाधारक पिस्तूल जमा करायला आलेला शिवसेना कार्यकर्ता पोलिस अधिकाऱ्याकडून त्याचे पिस्तूल हाताळले जात असताना अचानक गोळी सुटून जखमी झाल्याचा प्रकार अंबोली येथे घडला. पोलिस ठाण्यातच घडलेल्या या प्रकारामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, जखमी कार्यकर्त्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले असून सायंकाळी त्याला घरी सोडण्यात आल्याचे समजते.
विकास जाधव (36) असे या जखमी झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील राजकीय व्यक्ती व त्यांच्या कार्यकर्त्यांकडे असलेली शस्त्रे ते राहत असलेल्या परिसरातील पोलिस ठाण्यांत जमा करण्यात येत आहेत. त्यानुसार जाधव हेसुद्धा त्यांच्याकडील परवानाधारक पिस्तूल अंबोली पोलिस ठाण्यात जमा करायला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गेले होते. या वेळी तेथे हजर असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने त्यांच्याकडील पिस्तुलाची तपासणी करायला सुरुवात केली. पिस्तुलाचे तोंड जमिनीकडे ठेवून सुरू असलेल्या तपासणीच्या वेळी अधिकाऱ्याकडून अचानक पिस्तुलाचा चाप ओढला गेला. यातून सुटलेली गोळी जमिनीवरील फरशीवर आदळून जाधव यांच्या छातीवर लागली. या घटनेत छातीला गोळी चाटून गेल्याने जाधव जखमी झाले. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचे समजते. एका अधिकाऱ्याकडून अनवधानाने झालेल्या या प्रकाराची माहिती रात्री उशिरापर्यंत पोलिस दडवत होते.


(sakal,13 april)

No comments: