Tuesday, April 7, 2009

ऍड. वाघमारे यांना कडेकोट सुरक्षा
राकेश मारिया : "झेड दर्जा'बाबत मात्र दुजोरा नाही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 1 : मुंबई हल्ल्यातील अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याचे वकीलपत्र घेणाऱ्या ऍडव्होकेट अंजली वाघमारे आणि त्यांच्या सहायक वकिलाला मुंबई पोलिसांनी आवश्‍यक ती सुरक्षा व्यवस्था पुरविली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली, मात्र ही सुरक्षा झेड दर्जाची असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिलेला नाही.
मुंबई हल्ल्याचा खटला चालविण्यासाठी या हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी कसाब याला ऍड. अंजली वाघमारे यांच्या रूपात वकील मिळाला. कसाबचे वकीलपत्र घेतल्यानंतर वाघमारे राहत असलेल्या वरळी पोलिस कॅम्प येथील घरावर शिवसैनिकांनी सोमवारी मध्यरात्री निदर्शने करीत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यानंतर ऍड. वाघमारे यांनी या खटल्यातून माघार घेण्यावर विचार करण्यासंबंधी एक दिवसाची मुदत मागितली होती. राकेश मारिया आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर वाघमारे यांनी आज कसाबचे वकीलपत्र घेण्यावर ठाम असल्याची भूमिका स्पष्ट केली. वाघमारे यांच्या भूमिकेनंतर मुंबई पोलिसांनी त्यांना आणि या खटल्यासाठी त्यांची मदत करणारे वकील के. पी. पवार यांना आवश्‍यक ती सुरक्षा व्यवस्था पुरविली आहे. खटला संपेपर्यंत वाघमारे व पवार यांना ही सुरक्षा पुरविली जाणार असल्याचे मारिया यांनी सांगितले.

------

मुंबई हल्ल्यातील अतिरेकी मोहम्मद अजमल कसाबचे वकीलपत्र घेतलेल्या ऍड्‌. अंजली वाघमारे यांच्या घरासमोर निदर्शने केल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी शिवसेनेच्या आठ कार्यकर्त्यांना अटक केली. अटक केलेल्या या कार्यकर्त्यांत अतिरेकी कसाब याला जिवंत पकडताना धारातीर्थी पडलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक शहीद तुकाराम ओंबळे यांचा चुलत चुलतभाऊ एकनाथ ओंबळे यांचाही समावेश आहे. एकनाथ ओंबळे शिवसेनेचे उपशाखाप्रमुख आहेत.

No comments: