दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयासमोर एका व्यापाऱ्याने आधीच्या भांडणाचा राग मनात धरून एका व्यक्तीवर गोळीबार केल्याचा खळबळजनक प्रकार शीव कोळीवाडा येथे घडला. ऐन निवडणूक काळात घडलेल्या या घटनेने या परिसरात काही काळ तणाव पसरला होता. या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी व्यापाऱ्याला अटक केली असून, सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती परिमंडळ-4 चे पोलिस उपायुक्त सुनील बाविस्कर यांनी दिली. गोळीबार करणारा व्यावसायिक कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे समजते.
शीव कोळीवाडा येथे सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या ठिकाणी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांचे प्रचार कार्यालय आहे. कार्यालय असलेल्या इमारतीतच एअर केअर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड नावाचे एसी विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. या दुकानाचा मालक असलेला जॉन रिबेलो (वय 45) याचे याच परिसरात राहणाऱ्या रामचंद्र हसू पाटील (47) यांच्यासोबत क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. दोघांमधील वाद वाढत गेल्याने रागाच्या भरात रिबेलो याने पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. ऐन गर्दीच्या ठिकाणी केलेल्या या गोळीबारामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गोळीबार करणाऱ्या जॉन रिबेलो याला ताब्यात घेतले. त्यानंतर रामचंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून रिबेलोविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून, त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त बाविस्कर यांनी दिली. रिबेलो कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे की नाही याची तपासणी सुरू आहे.
(sakal,13 april)
No comments:
Post a Comment