Tuesday, April 7, 2009

राज्य सरकारकडून एनएसजीला 23 एकर जमीन

मरोळला तळ ः फक्त पायाभूत प्रशिक्षणाची व्यवस्था

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा दलाचा (एनएसजी) तळ उभारण्याकरिता मरोळ येथील 23 एकर जागा राज्य सरकारने एनएसजीला दिली आहे. या तळाची उभारणी करण्यासाठी एनएसजीने किमान दीडशे एकर जागेची मागणी केली होती. मात्र मुंबईत जागेच्या अनुपलब्धतेमुळे एनएसजीला पहिल्यांदाच एवढ्या कमी जागेत आपला तळ उभा करावा लागणार आहे.

26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर आपत्कालीन स्थितीत दहशतवादाचा मुकाबला करण्याकरिता मुंबईत राष्ट्रीय सुरक्षा दलाचा तळ ठेवण्यावर केंद्रीय गृहखात्याने शिक्कामोर्तब केले. हा तळ उभारण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाने राज्य सरकारकडे दीडशे एकर जागेची मागणी केली होती. मुंबईत एवढी मोठी जागा उपलब्ध नसल्याने कल्याण, नवी मुंबई आणि डहाणू येथील जागांचा पर्यायही राज्य सरकारने ठेवला होता. मात्र, आपत्कालीन स्थितीत संपूर्ण पश्‍चिम विभागाच्या सुरक्षिततेसाठी या दलाची मदत घेणे शक्‍य व्हावे म्हणून त्यांचा तळ मुंबई विमानतळानजीकच ठेवण्याचे ठरले. अंधेरीत मरोळ येथे मुंबई पोलिसांच्या मालकीची शंभर एकर जागा आहे. ही जागा पोलिस प्रशिक्षण व कवायतींसाठी वापरली जाते. राष्ट्रीय सुरक्षा दलाला मुंबईबाहेर जागा दिल्यास आपत्कालीन स्थितीत या पथकाचे जवान हवाईमार्गे मुंबईत उतरण्यास उशीर होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळेच मुंबई पोलिसांकडील जागेपैकी संशोधन केंद्राची 23 एकर जागा राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या तळाला देण्यास सरकारने अनुमती दिली. राष्ट्रीय सुरक्षा दलाचे महासंचालक एनपीएस अलख यांनीदेखील या जागेला काही दिवसांपूर्वी भेट दिली. क्षेत्रफळाने लहान असली तरी ही जागा तळ उभारणीच्या दृष्टीने आदर्श ठरणार आहे. त्यामुळे या जागेला एनएसजीने पसंती दिली आहे. या ठिकाणी जवानांना पायाभूत प्रशिक्षण देता येणार आहे. अधिक प्रशिक्षणासाठी जवानांना आवश्‍यकतेनुसार मणेसर येथे पाठविले जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी या तळाच्या बांधणीचे काम पूर्ण करण्याचे राष्ट्रीय सुरक्षा दलाने ठरविले आहे. तळ उभारणीच्या कामावर लक्ष ठेवण्याकरिता या पथकाचे काही अधिकारी गेले काही दिवस मुंबईत मुक्कामाला आहेत.

(sakal,31march)

No comments: