Tuesday, April 7, 2009

पगार रखडल्याने पोलिस नाराज

प्रशासकीय दिरंगाई ः पुढचा आठवडा उजाडणार

पोलिस दलातील अस्थायी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्यासंबंधीचे आदेश गृहखात्याने अद्याप काढले नसल्याने मुंबईसह राज्यातील सर्वच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. या आठवड्यात असलेल्या सरकारी सुट्यांमुळे पोलिसांना त्यांचा मार्च महिन्याचा पगार मिळायला पुढचा आठवडा उजाडण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, ऐन निवडणूक बंदोबस्ताच्या काळात मासिक वेतनापासून वंचित राहावे लागणार असल्याने पोलिसांत नाराजीचा सूर आहे.

राज्य पोलिस दलात स्थायी आणि अस्थायी स्वरूपात सुमारे पावणेदोन लाख पोलिस कार्यरत आहेत. या अस्थायी पोलिसांना मुदतवाढ देण्यासंबंधीचे आदेश गृहखात्याकडून या महिन्यात निघणे अपेक्षित होते; मात्र गृहखात्याच्या प्रधान सचिव कार्यालयातील एक अतिवरिष्ठ अधिकारी 20 मार्चपासून आजारपणाच्या रजेवर गेला आहे. त्यामुळे अस्थायी कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीच्या आदेशावर अद्याप सह्याच झालेल्या नाहीत. स्थायी आणि अस्थायी पोलिसांचे मासिक वेतन एकत्रितच निघत असल्याने मुंबईसह राज्यातील सर्वच पोलिस पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यभरातील पोलिसांचे पगार महिनाअखेरीस निघतात. उशीर झालाच तर तो एका दिवसापुरता होत असतो. मार्च महिन्यात आर्थिक वर्ष संपत असल्याने पगाराला दोन ते तीन दिवस उशीर होणे ग्राह्य धरले जाते; मात्र यंदा अस्थायी कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीच्या आदेशावर सह्या करणारा अधिकारीच उपलब्ध नसल्याने सर्वच पोलिसांना याचा फटका बसला आहे. महिन्याचा पहिला आठवडा उलटून जात असतानाही हातात पगार न पडल्याने अनेक पोलिसांच्या घरातील आर्थिक नियोजन कोलमडून पडले आहे.
अस्थायी कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीच्या आदेशावर सह्या करून पोलिसांचे पगार काढण्याची कार्यवाही पूर्ण होईल अशी तजवीज करण्यासाठी आज गृहखात्याने आजारपणाच्या रजेवर गेलेल्या अधिकाऱ्यांचा पदभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविला; मात्र सायंकाळी उशिरापर्यंत या आदेशावर सहीच झाली नव्हती, असे खात्रीलायक वृत्त आहे. मुंबई पोलिसांच्या आस्थापना शाखेचे अधिकारी व कर्मचारी गृहमंत्रालयात या आदेशावर सही होण्यासाठी सकाळपासून तिष्ठत उभे होते. या आदेशावर उद्यापर्यंत सह्या होणे अपेक्षित आहे. या आठवड्यात 7,10,11 व 12 एप्रिल, तर पुढील आठवड्यात 14 एप्रिलला सरकारी सुट्या आहेत.त्यामुळे पोलिसांना मार्च महिन्याचा पगार मिळण्यासाठी किमान 15 एप्रिलचा दिवस उजाडेल. त्यामुळे कधी नव्हे तो सामान्य पोलिसांना पहिला पंधरवडा उसनवारीवरच घालवावा लागणार असल्याचे चित्र आहे. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने अनेकदा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पगारासंबंधी काहीच देणे-घेणे नसते. सामान्य पोलिसांना मात्र प्रशासकीय कामकाजातील उदासीनतेचा असा फटका बसतो, अशी प्रतिक्रिया एका पोलिस कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

(sakal,7 april)

No comments: