Tuesday, April 7, 2009

राहुलराज एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांना क्‍लीन चीट

अंधेरीहून कुर्ल्याला जाणाऱ्या बेस्ट बसमध्ये बिहारी तरुण राहुलराज याच्या एन्काऊंटरप्रकरणी चौकशी करणाऱ्या गुन्हे शाखेने पोलिसांना "क्‍लीन चीट' दिली आहे. गुन्हे शाखेने तसा अहवाल न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सोपविला आहे.
बिहारहून आलेल्या राहुलराज कुंदप्रसाद सिंग या बावीसवर्षीय तरुणाने गेल्या वर्षी 22 ऑक्‍टोबर रोजी बेस्ट बसमधून प्रवास करताना रिव्हॉल्व्हरच्या धाकाने बसमधील प्रवाशांना ओलिस धरले होते. या वेळी त्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मारायला आलो असल्याचे सांगत प्रवाशांवर गोळीबार केला होता. यानंतर पोलिसांनी त्याच्यावर केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला होता. राहुलराजच्या मृत्यूनंतर देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणावरून उत्तर भारतातील सर्वपक्षीय नेत्यांनी पंतप्रधानांचीही भेट घेतली होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा या एन्काऊंटरप्रकरणी चौकशी करीत होती. या एन्काऊंटरच्या चौकशीसंबंधीचे गुन्हे शाखेचे काम संपले असून त्यासंबंधीचा अहवाल नुकताच मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. या अहवालात पोलिसांना क्‍लीन चीट देण्यात आली आहे. या अहवालात राहुलराजवर लांबून गोळ्या झाडण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

(sakal,6 april)

No comments: