Wednesday, April 15, 2009

एअर इंडियाला धमकीचे ई-मेल

पोलिस तपास सुरू ः विमानतळावरील सुरक्षा कडक

एअर इंडियाला गेल्या काही दिवसांत धमकीचे दोन ई-मेल आले असून अधिक तपासासाठी ते मुंबई पोलिसांकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्‍त्यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दिली.
नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाचे मुख्यालय बॉम्बस्फोटांनी उडवून देण्याबाबतचे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्टीकरणही कंपनीच्या प्रवक्‍त्यांनी केले. दरम्यान, मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या सौदी अरेबिया एअरलाइन्सच्या विमानांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जाण्याची शक्‍यता असल्याची शक्‍यता गुप्तचर खात्याने वर्तविल्याने विमानतळ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
देशातील प्रमुख एअरलाइन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या एअर इंडियाची नरिमन पॉइंट येथील इमारत बॉम्बस्फोटांनी उडवून देण्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर आज एकच खळबळ उडाली. या वृत्ताची तातडीने दखल घेत एअर इंडियाच्या प्रवक्‍त्यांनी धमकीचे ई-मेल आल्याचे मान्य केले. कंपनीच्या अधिकृत पत्रव्यवहारांच्या ई-मेल ऍड्रेसवर हे ई-मेल आले आहेत. एअर इंडिया व्यवस्थापनाने या ई-मेलचे गांभीर्य लक्षात घेऊन ते मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे पाठविले आहेत. यापुढे पोलिस अधिक तपास करीत असल्याचे सांगून या ई-मेलमधील मजकूर स्पष्ट करण्यास कंपनीच्या प्रवक्‍त्यांनी मात्र नकार दिला.
याच वेळी मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या सौदी अरेबिया एअरलाइन्सच्या विमानांवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो. याशिवाय कफ परेडच्या मेकर चेंबरमध्ये असलेल्या अरेबियन कौन्सिलेटलाही अतिरेक्‍यांपासून धोका आहे. त्यामुळे या परिसरातील सुरक्षा व्यवस्थाही वाढविण्याच्या सूचना गुप्तचर खात्याने पोलिसांना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, विमानतळाच्या सुरक्षिततेचा विचार करता या ठिकाणी नेहमीच कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येते. त्याचप्रमाणे आताही विमानतळावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती सुरक्षा विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त विनय कारगावकर यांनी दिली.

(sakal,9 april)

No comments: